“मी अनुभवलेला वक्ता ” कथा कथनकार प्रा. रविंद्र कोकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । बारामती । काल तीस जून गुरू पुष्यामृताचा मुहूर्त व नुकतीच वाल्मीक ऋषींची पालखी माझ्या गावातून पुढे गेली. दर्शन घेऊन मी निरा नदीच्या पुलावर मावळती च्या सूर्याचे प्रतिबिंब निहाळत बसलो होतो. इतक्यात एक ब्रिजा गाडी येऊन थांबली व मला आवाज दिला. पाठीमागे पाहिले तर प्रसिद्ध कथा कथनकार रवींद्र कोकरे सरांची ती गाडी होती.” या बसा “म्हणताच मी गाडीत बसलो. मला वाटलं सरांच्या बरोबर आता भिवाई देवीचे दर्शन घडणार. पूल ओलांडताच सरांनी फलटणच्या दिशेने टर्न घेतला. मी म्हटले “सर” तोच सर मला म्हणाले “चला आज एका चांगल्या कार्यक्रमाचे तुम्ही साक्षीदार होणार आहात “. सरांचं व्याख्यान आज ऐकायला मिळणार यामुळे मी खुश होतो. थोड्याच वेळात गाडी सस्तेवाडी ता. फलटण येथील मुक्ताई मंगल कार्यालया समोर थांबली .सरांनी आपल्या नेहरु वर नेहमी प्रमाणे जॅकेट घातल्यावर दार उघडल तोच सरांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजक योगशिक्षक शिवराज (शेठ) कदम यांनी अगदी अदबीने सरांना नमस्कार केला व पाठोपाठ हलग्यांचा आवाज कडाडला अगदी पारंपारिक पद्धतीने सरांचे स्वागत करत त्यांना मंचावर नेण्यात आलं .मला वाटलं होतं हा लग्न समारंभाचा कार्यक्रम असावा. पण स्टेजवर पाठीमागे लावलेला फॅलेक्स पाहून लक्षात आलं हा लहान मुलाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे.

मी अनेक मंगल कार्यालये पाहिली पण सस्तेवाडीच हे मुक्ताई मंगल कार्यालय जे आत्माराम सस्ते सरांच आहे याचे एक वेगळे वैशिष्ट्य मला जाणवले. ते म्हणजे कार्यालयात उद्घाटनाला अमुक मंत्री आला अशी कोणतीही पाटी नव्हती. त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज सावित्री फुले ,जिजाऊ, अहिल्यादेवी या समाज सुधारकांचे फोटो होते. मान्यवरांचे स्वागत फळ झाडांची रोपटी देऊन करण्यात आलं, अर्थातच सरांच्या मुळे माझेही नाव त्या यादीत होतं .

आता सात वाजत आले होते हजारोंच्या संख्येने कार्यालय भरले होते. त्यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता. सर बोलायला उभे राहिले आणि जोराचा पाऊस आला आज ज्ञानोबांची पालखी फलटण मध्ये येणार याची पूर्व सूचना व स्वागताची जणू तयारी करण्यासाठीच पाऊस आला होता . बळीराजासाठी हा पाऊस किती महत्त्वाचा आहे असं म्हणत सरांनी बोलण्यास सुरुवात केली. अन सरांनी वाढदिवस कसा असावा ह्या मूळ मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले .

आज वाढदिवसाचे स्वरूप पाहता आपण पाश्चिमात्यांच अनुकरण करत नाही ना हे पाहिलं पाहिजे. पाहिजे. “मेणबत्ती विजवून केक कापण्यापेक्षा, दिवे पेटवून फळे कापा ” हा मोलाचा संदेश त्यांनी दिला .आईला आई वडिलांना बाबा म्हणायला शिकवा इंग्रजी शाळेत शिकला म्हणून तुम्ही मम्मी होऊ नका. ममी म्हणजे काय हे त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीने सरांनी सांगत पटवून दिले. लग्न समारंभासाठी केवळ देखावा म्हणून खर्च करू नका तर मुला मुलींच्या भवितव्याचा विचार करा. मुलीच्या जन्माच स्वागत करा.सरांच्या व्याख्यानानंतर शार्दुल कदम याचा वाढदिवस फळे कापून साजरा झाला. त्याला औक्षण करण्याचा पहिला मान हा विधवा महिलेला मिळावा, ही सरांनी केलेली सूचना तात्काळ अमलात आणण्यात आली .त्यानंतर तेथील शाळेला वह्या व पुस्तकांचे वाटप सरांच्या हस्ते करण्यात आले . फलटण येथील लेखक सुरेश शिंदे यांची ” सर्जा ” हि कांदबरी मला सरांच्या हस्ते भेट म्हणून मिळाली. यावेळी फलटण तालुक्यातील मान्यवर शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी ज्यांनी गर्दी केली त्यात सरांचे माजी विद्यार्थी होते. एखाद्या शिक्षकाचा किती पगार या पेक्षा शाळेबाहेर किती वर्षांनी विद्यार्थी त्यांना ओळख देतात हे मला महत्त्वाचं वाटलं. असा कार्यक्रम आज ज्या ठिकाणी केक किंवा पशुपक्षी कापत असतील तर त्या ठिकाणी सर जाण्याचे टाळतात ते अशा कार्यक्रमात सत्कार किंवा निमंत्रण ही स्वीकारत नाहीत. यावरून मला कवी देवा झिंजाड यांचे एक वाक्य आठवलं ते नेहमी सांगतात “तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर पडू देऊ नका नाहीतर लोक तुम्हाला टाळतात.” कोकरे सरांची हि समाज सुधारण्यासाठीची चळवळ पाहता याची जडणघडण व सुरुवातच मुळी प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे झाली . ज्यावेळी मला त्यांचा “थापणूक” हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला त्यावेळी त्यांच्यातील अंधश्रद्धे विरुद्ध आवाज उठवणारा समाज सुधारक दिसून आला . लोकनेते माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी फलटणमध्ये केलेली भाषणे असोत, किंवा मराठी साहित्य परिषदेतर्फे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये भरवलेली साहित्य संमेलने असोत, साहित्याची ही दिंडी त्यांनी महाराष्ट्रभर फिरवली महाराष्ट्रभर दौरे केले .ते नुसते व्याख्यान सांगत नाहीत तर तशी कृती करतात अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वात मला वकृत्वाबरोबर नेतृत्व ,कर्तुत्व हे ही गुण त्यांच्यात दिसून आले.ते नुसतेच व्याख्यान सांगत नाहीत तर तशी कृती करतात, त्यांच्या कृतीतून ही चळवळ ते समाजापुढे ठेवतात.

असे हे व्याख्याते बारामतीकरांना लाभले व साहित्य क्षेत्रात मला मित्र म्हणून लाभले हे मी माझं भाग्य समजतो .

युवराज खलाटे
( बारामती )


Back to top button
Don`t copy text!