“मी दुसऱ्याच्या घरात पाहत नाही, पण काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही” – नाना पटोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्यातील राजकीय वातावरण देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. शिंदे-फडणवीस सरकारची न्यायालयीन लढाई आणि महाविकास आघाडीत असलेली धुसफूस पाहता भाजप नेते अनेक आमदारांच्या पक्षप्रवेशाचा दावा करत आहेत. त्यामुळे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे. अजित पवार हे काही आमदारांसह भाजपात प्रवेश करतील, असा दावा काही भाजप नेते करत आहेत. मात्र, अजित पवार यांनी आज स्वत: माध्यमांसमोर येऊन मी राष्ट्रवादीच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर, आता काँग्रेस नेत्यांच्या फुटीसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडणार नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीत अजित पवार आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हे पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांनंतर सातत्याने रंगत आहे. मात्र, या केवळ वावड्या असून माध्यमांत पेरण्यात आलेल्या बातम्या असल्याचं संबंधित नेत्यांकडून सांगण्यात येतं. त्यातच, अजित पवार यांनी गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तर, अशोक चव्हाण यांनीही यापूर्वी स्पष्टीकरण दिलं असून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेसमधील फुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यानुसार, काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडणार नसून पक्षातील सर्व आमदार, नेते पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच, दुसऱ्या पक्षाबाबत मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे ते मला माहित नाही. मी दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे हे डोकावून पाहत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले. तर, अजित पवार भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही. भाजपने राजकारणातील हा खेळ बंद करावा, अशी अपेक्षाही नाना पटोले यांनी व्यक्त केली. तसेच, काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. काँग्रेस एकसंध असल्याचे पटोले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!