मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहीत नाही; शरद पवारांची गुगली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असताना आपल्याला याची माहिती नसल्याचे सांगत मुख्यमंत्री बदलायचा असेल तर आम्हाला कुणी सांगायचे कारण नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबावत संशयाचे भूत कायम असतानाच आता भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लागले आहेत. संजय राऊत यांनीही दिल्लीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी संजय राऊत पत्रकारही आहेत. पत्रकारांना अधिक माहिती असते, अशी टिप्पणी केली.

अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी बॅनर लावलेत त्यांनी हा वेडेपणा करू नये, असे अजित पवार यांनीच म्हटले आहे, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा नाही. ठाकरेंनी मला प्रस्ताव दिला अशी बातमी कुणी तरी अशीच तयार केली आहे. माझ्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही, असेही पवार म्हणाले.

शिंदे लवकरच लाँग लिव्हवर जातील : राऊत
शरद पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला, हे खोटे आहे. मी स्वतः बैठकीत होतो. त्यामुळे ही अफवा आहे, असे ठामपणे सांगतो, असे शिवसेना नेते (ठाकरे गट) खा. संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्ज लागली असतील तर लागू द्या, ज्याच्यामागे १४५ जण आहेत, तो मुख्यमंत्री होईल. तसे वाटण्यात गैर काही नाही. तसेही शिंदे आता लवकरच लाँग लिव्हवर जातील, असेही राऊत म्हणाले.

मी सुट्टीवर नाही, डबल ड्युटीवर 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी गेल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याची टीका केली. त्याला शिंदे यांनी मी सुट्टीवर कधीच जात नाही. मी डबल ड्युटीवर आहे, असे म्हटले आहे.

ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री
महाविकास आघाडी व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे मांडली.


Back to top button
Don`t copy text!