या प्रश्नावर बोलताना रामराजे म्हणाले की, खासदारांना एकच भीती वाटत आहे की, मी माढा मतदारसंघातून उभा राहिलो, तर त्यांचे काय होईल. त्यांना सोलापूरची मते मिळतील का? फलटण-कोरेगावचं काय होईल? मागील निवडणुकीत आमच्या उमेदवाराला सोलापूरमध्ये कमी मते पडली, ते स्थानिक काही प्रश्नांमुळे पडली. माळशिरस तालुक्यात जे राजकारण झाले, त्याची एक लाख मते त्यांना मिळाली. बाकी त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. माळशिरस तालुक्याची संपूर्ण रचना दोन गटांची आहे. एक विजयसिंह मोहिते-पाटील गट, शंकरराव मोहिते-पाटील गट व दुसर्या समाजाचा गट, जो त्यांना मदत करतो. हे दोन घटक जेव्हा एकत्र आली तेव्हा त्यांना मते पडली. माढा, सांगोल्यात त्यांना मते मिळाली नाहीत. मोदींच्या सभेमुळे झाली, हे मी म्हणणार नाही. कारण मोदींएवढा मी मोठा नाही. मी देशाचे राजकारण करायला तयार नाही. माझे राजकारण फक्त सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रापुरते केंद्रित आहे. माढ्यासाठी तुम्ही तयारी करताय का? यावर रामराजे म्हणाले की, ते लोकं ठरवतील. पक्षाची त्याबाबत काही चर्चा नाही. नुकताच खासदारांचा दौरा झाला, आता ते आठ महिने दिसरणारंच नाहीत. त्यांची तयारी एवढीच असते की, आमच्यातले कोण फुटतात का? अडीच वर्षात त्यांना आमच्यातले कोण सापडले नाहीत. हे मी फलटण तालुक्यापुरते बोलतोय. पार्टीचा फायदा घेऊन माळशिरसमध्ये काही जमतंय का, सांगोल्यात काही जमतंय का, हे ते बघत आहेत. त्यांना सगळे रेडिमेडच मिळतंय. पाण्याचा प्रश्न रेडिमेडच मिळालाय. खासदारकीही रेडिमेड. असं सगळं रेडिमेड मिळालंय. ते सुदैवी माणूस आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा…