पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे – सुप्रिया सुळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । मुंबई । राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज वर्धापन दिन असून यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड 
सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानताना म्हटले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.”

शरद पवारांची मोठी घोषणा 
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती. पण कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर करून म्हटल्याप्रमाणे भाकरी फिरवली आहे.

प्रफुल्ल पटेल हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा आदी राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंना देखील पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!