‘मी पुन्हा येईन म्हणायची भीती वाटते’, अमोल कोल्हेंचा टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२३ । शिरुर । पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण, सर्वच पक्षांनी आतापासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. विलास लांडे आणि कोल्हे यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. या सर्व चर्चेदरम्यान अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यंदा विलास लांडे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान, आज झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, ‘शरद पवारांनी आज शिरूर मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 2019 साली मी इथली निवडणूक बैलगाडा शर्यती, पुणे-नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि पुणे-नाशिक रेल्वे या तीन मुद्द्यांवर लढवली. बैलगाडा शर्यत आणि पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी हे दोन प्रश्न सुटले आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प भूसंपादन आणि कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. हा आढावा शरद पवारांसमोर मांडला’, अशी माहिती कोल्हेंनी दिली.

ते पुढे म्हणाले, जनसंपर्काबाबत काही सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत, त्यानुसार आगामी काळात काम करणार आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्ष घेईल. शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नये. मी कलाक्षेत्रात काम करतो, अनेकांच्या भेटी होतात, त्याचा वेगळा अर्थ काढू नये. मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरूच आहे. माणूस महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा आहे. अंतिमत: पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब

आज शिरुर मतदारसंघाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा कोल्हेंना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. शिरूर लोकसभा निवडणुकी संदर्भात पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना निवडणूक लढवावी लागेल. मात्र शिक्कामोर्तब झालं नाही. निवडणुका लागल्या की शिक्कामोर्तब होईल, असं मत विलास लांडे यांनी व्यक्त केले आहे.


Back to top button
Don`t copy text!