स्थैर्य, महाबळेश्वर, दि.६: महाबळेश्वर येथील वेण्णालेक तलावात महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचा संशय आहे. या घटनेने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेण्णालेक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवानांच्या सहकार्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आणि मंगळवारी शोधकार्य सुरू होते. वेण्णालेक तलावात पाणी जास्त व रात्री अंधार होत असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. ज्योती कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांची कार वेण्णालेकच्या एका वळणावर उभी असल्याचे आढळून आले होते. वाहनात दिपक यांचे जॅकेट, स्वेटर गाडीच्या मागील सीटवर आढळले. तर नजीकच लोखंडी ब्रिजवर त्यांच्या चप्पला आढळून आल्याने त्यांनी वेण्णालेकमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. यानुसार महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान वेण्णा तलावात शोध घेत आहेत .याशिवाय दिपक कांदळकर यांनी आपले जवळचे मित्र जीवन महाबळेश्वरकर यांना डेीीू इहर्री ङरज्ञश अशा आशयाचा वॉटस्अप मॅसेज 6.52 मिनिटांनी केला होता. सोमवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेली शोध मोहिम रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होती. दुसर्या दिवशी मंगळवारी पहाटे सहा वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी शोध मोहिमेस प्रारंभ केला. स्कूबा ड्रायव्हर्सच्या सुद्धा टीमला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी नगरपालिका कर्मचारी पोलिस प्रशासन दाखल झाले आहे. फिश डिटेक्टरच्या साह्याने देखील शोध मोहिम सुरू आहे. वेण्णालेक तलावात पाणी जास्त असल्याने शोध मोहिमेत अडथळा येत आहे. महाबळेश्वर पोलिस निरिक्षक बि. ए. कोंडूभैरी आणि पोलिस उपनिरिक्षक अब्दुल बिद्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर पालिकेचे उपनगराध्यक्ष अफझल सुतार, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक कुमार शिंदे, नगरसेवक संदीप साळुंखे, यूसूफ शेख, रविंद्र कुंभारदरे, दत्तात्रय वाडकर, अॅड. संजय जंगम आदी उपस्थित असून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.