स्थैर्य, पाटण, दि. ३० : रासाटीमध्ये (ता. पाटण) हस्तकला व एम्ब्रोडरी व्यवसाय करण्यासाठी जागेचा ना हरकत दाखला देण्याच्या ठरावाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रासाटीच्या महिला सरपंचासह त्यांचे पती व ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघानांही अटक करण्यात आली आहे. रासाटीच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा कदम, त्यांचे पती बंडू कदम व सदस्य सचिन कदम अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. रासाटी ग्रूप ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचासह एक सदस्य एका गटाचे, तर बहुमतात दुसरा गट आहे.लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील एका व्यावसायिकाने रासाटी येथे व्यवसायासाठी जागा मिळावी म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.
रासाटी ग्रामपंचायतीची 29 जूनला मासिक बैठक झाली. त्यात तो ठराव बहुमताने मंजूर झाला. बहुमताने मंजूर झालेला दाखला दि. 3 जुलैला तयार झाला. मात्र, तो संबधितांना देण्यात आला नाही.ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सरपंच व सदस्याने तो आपल्याकडेच ठेवला. या ठरावाची प्रत देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांनी सापळा रचला. मागणी केलेली रक्कम मिळाल्यानंतर दाखला देण्यात येणार असल्याने तक्रारदाराने दाखल्यासाठी ठरलेल्या 15 हजारांपैकी दहा हजार रूपये ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांना दिली. ही रक्कम स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सरपंच व त्यांच्या पतीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.