कोरोनाच्या संकटात अम्फान चक्रीवादळाचा फटका


भारत-बांगलादेशात 16 जणांचा मृत्यू

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २१ : पूर्व भारत आणि बांगलादेशाला बुधवारी (20 मे) अम्फन चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात आतापर्यंत कमीत कमी 16 जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या दोन दशकातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ म्हणजेच महाचक्रीवादळ होतं.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फन चक्रीवादळ भारतात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशला धडकलं. या भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

या तिन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं कोसळली, हजारो घरं जमीनदोस्त झाली तर लाखो लोकांवर परिणाम झाला. कोरोनाचं संकट असताना सोशल डिस्टंसिंगचं पालन करत सर्वांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणं कठीण काम असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमध्ये अम्फनमुळे ताशी 165 किमी वेगाचे वारे वाहिले आणि पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं सांगितलं जात आहे.

पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. या दोन जिल्ह्यांमधल्या अनेक भागांमध्ये संपर्क तुटला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

ममता बॅनर्जींनी म्हटलं, “आतापर्यंत 5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. मला वाटतं चक्रीवादळामुळे होणारं नुकसान कोरोनाच्या संकटामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा मोठं असेल.”

चक्रीवादळाचा बांगलादेशाला जबर तडाखा

बांगलादेशातल्या सुंदरबन भागातल्या खारफुटीच्या जंगलावर अम्फन चक्रीवादळाचा मोठा परिणाम झाल्याचं बांगलादेशातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, या भागातून अजून पुरेशी माहिती हाती आलेली नाही.

चक्रीवादळामुळे बांगलादेशातल्या किनारपट्टी लगतच्या नैऋत्येकडच्या सातकिरा जिल्ह्यात ताशी 151 किमी वेगाने वारे वाहत होते, असं बांगलादेशच्या हवामान खात्याचे प्रमुख शमसुद्दीन अहमद यांनी सांगितलं.

बांगलादेशात जवळपास 30 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मात्र, यात सोशल डिस्टंसिंगचा पालन होत नसल्याने पुढे मोठा धोका उद्भवू शकतो, असं तज्ज्ञांना वाटतं.

बांगलादेशात चक्रीवादळामुळे 6 लोकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर बचाव कार्य करणाऱ्या दलातील एक जवान वाहून गेला.

फॉरेस्ट चीफ मोईनुद्दीन खान यांनी म्हटलं, “इथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अजून होऊ शकलेली नाही. चक्रीवादळामुळे अनेक जनावरंही पाण्यात वाहून गेलेली असू शकतात.”

बंगालच्या उपसागरात जवळपास दरवर्षी येतं चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात जवळपास दरवर्षी चक्रीवादळं निर्माण होतात. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात होतो.

2007 साली आलेल्या सिद्र चक्रीवादळामुळे बांगलादेशात साडे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

1999 साली आलेल्या सुपर सायक्लॉन म्हणजेच महाचक्रीवादळाने ओडिशामध्ये जवळपास दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 8 वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाचे वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात बांगलादेशात जवळपास 1 लाख 39 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 1970 साली आलेल्या चक्रीवादळ आणि पुरात जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!