
सातारा – येथील गवई विठ्ठल मंदिरात काकड आरती सोहळ्याप्रसंगी महाआरती करताना महिला सोहळ्यास उपस्थित सातारकर भावीक. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि.18 ऑक्टोबर : दरवर्षी चातुर्मासामध्ये अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा दरम्यान दरवर्षी एक महिन्याचा काकड आरती सोहळा संपन्न होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सातारा येथील श्री गवई विठ्ठल मंदिर, मंगळवार पेठ येथे हा काकड आरती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.
या मंदिरामध्ये अतिशय पारंपारिक आणि धार्मिक वातावरणात हा विशेष काकड आरती सोहळा संपन्न करण्यासाठी शेकडो वैष्णव भक्त मोठ्या संख्येने पहाटेपासून मंदिर परिसरात जमा होतात. त्यानंतर मंदिरात महिलांच्या करवी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला स्नान, धूप, दीप, नैवेद्य, लोणी साखर या प्रकाराने स्नान घातल्यानंतर पोशाख, बुक्का, पुष्प माला अर्पण करून विविध अलंकार घालण्यात येतात. या वेळेला अतिशय सुरेख आणि मधुर स्वरात गायली जाणारी या काकड आरती सोहळ्यातील विविध पदेही अनेकांचे मन भरून टाकणारी असतात. त्यानंतर नैवेद्य, विडा आणि महाआरती सोहळा संपन्न होऊन हा काकड आरतीचा सोहळा दररोज सुमारे दीड तास साजरा होतो.
या काकड आरती सोहळ्यासाठी विश्वस्त संतोष गवई, शैलेश गवई, गणेश गवई, सहाय्यक दिलीप दंडगे, दिलीप ढोणे, संजय क्षीरसागर, राजेश लोहार,गरगटे सौ. ज्योती गवई, सौ. प्रज्ञा गवई, सौ मीनाताई गुरव, कस्तुरीताई गुरव,कविता गुरव,सौ.शोभा ढोणे, मायाताई इनामदार प्रामुख्याने विशेषत्वाने या महिलांचा मोठा सहभाग असतो. तसेच आरतीनंतर सर्वांना तीर्थ ,प्रसाद ,मुगाच्या डाळीची खिचडी, फळे आणि गरम मसाला दुधाचा प्रसाद हातावर वाटप केला जातो. हा काकड आरती सोहळा आता कार्तिक पौर्णिमेपर्यंत मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत असून या काकड आरतीला सातारकर भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही गवई परिवाराच्या वतीने संतोष गवळी यांनी केले आहे.