स्थैर्य, फलटण : साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राचे आवारात वृक्षारोपण करताना डी. के. पवार शेजारी शंकरराव माडकर, डॉ. सोडमिसे, विक्रम भोसले, समीर भोसले, सतीश माने, आर. बी. भोसले, सुनील माने, आर. के. पवार, ज्ञानेश्वर भोसले वगैरे.
स्थैर्य, फलटण : वृक्षारोपणाद्वारे निसर्ग अधिक समृद्ध करण्याऐवजी मानवाने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन विस्तृत जंगले तर उजाड केलीच, वाढत्या लोकवस्तीला निवारा देण्यासाठी सिमेंटची जंगले उभारतानाही वृक्षसंवर्धनाला फाटा दिल्याने निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने आगामी काळात मानवाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागेल अशी भीती राज्य शासनाने वनश्री पुरस्काराने सन १९९९ मध्ये गौरविलेले, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राचे आवारात विविध ६१ फळ वृक्ष रोपांची लागण डी. के. पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आली, यावेळी फलटण पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, साखरवाडीचे सरपंच विक्रम भोसले, उपसरपंच समीर भोसले, प्रा. आरोग्य केंद्र साखरवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडमिसे, मातोश्री विकास सोसायटीचे मावळते व्हा. चेअरमन आर. बी. भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतीश माने, फलटण दूध संघाचे संचालक सुनील माने, आर. के. पवार, ज्ञानेश्वर भोसले, प्रा. आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि पिंपळवाडी साखरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
देशात व राज्यात करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉक डाऊन, गर्दीवर नियंत्रण, मास्क, सॅनिटायझर वापरा याच्या जोडीला सामाजिक, राजकीय, शासकीय, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याने ना. अजितदादा पवार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही राजकीय कार्यक्रम, मेळावा न घेता साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्राचे आवारात ६१ फळ वृक्षांची लागवड करुन, सुरक्षीत अंतर व अन्य करोना पार्श्वभूमीवरील नियम, निकषांचे पालन करुन वृक्षारोपण करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत ना. अजितदादा पवार यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख समाधान लाभावे, सर्व समाज करोना मुक्त व्हावा अशी प्रार्थना परमेश्वर चरणी करण्यात आल्याचे डी. के. पवार यांनी सांगितले.