दैनिक स्थैर्य । दि. २२ मार्च २०२३ । महाड । माणसाला माणूस म्हणून जगता यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजन्म लढा दिला त्यातीलच एक महत्वाचा लढा चवदार तळे सत्याग्रह, अमानवीय मनुवादी जातीव्यवस्थेमुळे “पाणी” पिण्याचा अधिकार अस्पृश्यांना नव्हता म्हणून १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास हजारो अनुयायांना घेऊन चवदार तळ्यावर पाणी सत्याग्रह केला, त्याच सत्याग्रहा निमित्त बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित ९६ व्या चवदार तळे सत्याग्रह, महाड क्रांतीदिन महोत्सव मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० मार्च २०२३ रोजी क्रांतीभूमी, महाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी जाहीर सभेचे अध्यक्षस्थान सभापती मा. आनंदराज आंबेडकर यांनी भूषविले व ओ.बी.सी. प्रबोधनकार मारुतीकाका जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे प्रमुख मार्गदर्शक तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे हे प्रमुख वक्ते तर उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव, रवींद्र पवार हे वक्ते म्हणून उपस्थित होते, सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत यांनी प्रास्ताविक सादर केले तर बुद्धवंदना व धार्मिक विधी संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार व इतर बौद्धाचार्य यांनी सुमधुर स्वरात सादर केली.
सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात “सध्या महामानवांचा अपमान करणाऱ्यांनाच ही मीडिया पाठराखण करीत आहे व हिंदुराष्ट्र हिंदुराष्ट्रच्या नावाखाली मनुवादी सनातन प्रवृत्ती फोफावत आहे, चार वर्णात विभागलेला हिंदू धर्म हा मनुस्मृती पुरस्कृत आहे म्हणून पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करण्यासाठी तुमच्या वाडवडिलांनी जे तेच तुम्ही करा असा खोटा दांभिकपणा माजवून पुन्हा एकदा चातुर्वर्ण समाजव्यवस्था लागू करण्याचा सरकारचा मानस आहे म्हणून येणारा काळ हा घातक आहे तरी आताच सावध रहा, येणारा काळ कठीण असून मनुवादी राजकारणी संविधान संपुष्टात आणून मनुस्मृती प्रणित नवीन घटना आणण्याच्या प्रयत्न करीत असून देशाला हुकूमशाहीच्या गर्तेत ओढत आहे, म्हणून प्रजासत्ताक भारत व प्रजासत्ताक भारताचे संविधान वाचवण्यासाठी आपसातील मतभेद आणि मतभेद, गटतट विसरून सर्वांनी एकत्र आल पाहिजे” असे प्रतिपादन व आव्हान सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
तसेच प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना कोकणातील गाडगेबाबा म्हणून सुपरिचित असणारे ओबीसींचे नेते प्रबोधनकार मारुतीकाका जोशी यांनी आपल्या भाषणात “बौद्ध समाज व अठरापगड जाती असलेला बहुजन समाज हे मुळातच बौद्धधम्मी आहेत त्यामुळे बौद्ध समाजाने मोठा भाऊ या नात्याने तेली, तांबोळी, साळी, माळी, कुणबी अश्या सर्व समाजांना एकत्र घेऊन बुद्धविहारात घेऊन त्याना प्रबोधन करावे माझ्या परीने मी प्रयत्न करतोय त्यात तुम्ही ही मदत करा आणि संविधान धोक्यात असल्याने भाषणबाजी बंद करून आता रडायचं नाही तर आता लढायच” असे आव्हान केले.
सदर प्रसंगी सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र यांद्वारे सकाळच्या सत्रात अनेक गायक कलाकारांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला व कार्यक्रमास रंग चढवला, सदर कार्यक्रमास कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर अश्या सर्व जिल्ह्यातील सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी, सभासद, गाव व तालुका शाखा, संघटना, बौद्धाचार्य, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.