स्थैर्य, फलटण, दि. २७ : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड नियंत्रण मोहीम सुरु असून फलटण तालुक्याच्या बागायती पट्ट्यात सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योजना समजावून घेऊन अंमलबजावणी करीत आहेत.
सावतामाळीनगर, राजाळे, ता. फलटण येथील शेतकरी शिवाजी बनकर यांच्या शेताच्या बांधावर असणार्या कडुलिंब झाडावरील हुमणी किडीचे भुंगे नष्ट करण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. हुमणी किडीचे भुंगे सायंकाळी 7.30 वाजता जमिनीतून बाहेर पडून कडुलिंबाच्या पानांचे कोवळे शेंडे खातात. त्यानुसार सायंकाळी शिवाजी बनकर यांच्या बांधावरील कडूलिंब झाडावर आलेल्या हुमणी किडीचे भुंगे रात्रीच्या वेळी काठीच्या सहाय्याने खाली पाडून 200 हुमणी भुंगे किटकनाशकामध्ये नष्ट करण्यात आले.
हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष, भुंगा असा असल्याने हुमणी किडीचा भुंगाच नष्ट केल्यास अळीची उत्पत्ती होणार नाही या उद्देशाने हुमणी किडीचा भुंगा नष्ट करण्याची ही योजना असल्याचे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी सांगितले.
हुमणीच्या अळीपासून पिकाचे होणारे नुकसान टाळून पिकाचे चांगले उत्पन्न घेणे शक्य होणार असल्याने त्यासाठी हुमणी किडीचे भुंगे नष्ट करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना 1 हुमणी भुंगा 50 ते 60 अंडी घालते म्हणजे 200 ÷ 60 = 12000 हजार अंडयापासून निर्माण होणारी हुमणी कीड अळी रोखण्यासाठी शेतकर्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन आपल्या बांधावरील कडूलिब झाडाची पहाणी करुन हुमणी कीड भुंगे नष्ट करण्यासाठी लाईट सापळा, एरंड मिश्रण सापळा, झाडावर कीटकनाशक फवारणी करणे, काठीच्या सहाय्याने हुमणी भुंगे खाली पाडून नष्ट करणे या पद्धतीने हुमणी कीड नष्ट करण्याचे आवाहन सचिन जाधव यांनी शेतकर्यांना केले. यावेळी हणमंत बनकर, नावनथ बनकर व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषि सहसंचालक, कोल्हापूर विभाग दशरथ तांबाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सातारा विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी, फलटण प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, मंडळ कृषी अधिकारी, बरड भरत रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात हुमणी कीड भुंगे नष्ट करण्याचे काम सुरु आहे.