कराड तालुक्यात पिकावर हुमणीचे संकट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. 26 : कराड तालुक्यात खरीप हंगामातील भुईमुगासह आले, ऊस या पिकांवर मोठ्या प्रमाणावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण पीक नष्ट होते की काय म्हणून शेतकरी धास्तावलेला असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. हुमणी या किडीचे नवीन संकट शेतकर्‍यांपुढे उभे ठाकले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका म्हणून कराड तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र खरिपाचे घेतले जाते. या खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, भात, मका, तूर, चवळी, मूग, सूर्यफूल यासह बागायती क्षेत्रात आले, हळद, ऊस यासह भाजीपाला अशी पिके घेतली जातात. सध्या जलसंधारणाच्या कामामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरीही खरीप हंगामात खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. विभागात सध्या खरिपाची पेरणी पूर्ण होऊन एक ते दीड महिना पूर्ण झाला असून हंगामातील भुईमूग, सोयाबीन, भात, आले या पिकांना हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून सर्वाधिक प्रादुर्भाव भुईमुगावर झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला भुईमूग व अन्य पिके  फस्त केली आहेत.

या हुमणीचे वैशिष्ट्य म्हणजे हुमणी मातीत शिरून जमिनीत आतून पिकांची मुळे खाऊन टाकते. त्यामुळे वरती पीक वाळून जाते. अशी परिस्थिती कराड तालुक्यातील नांदगाव, उंडाळे, येळगाव, कासारशिरंबे, कोळे, कालवडे, बेलवडे, येवती, काले, तुळसण, सवादे , ओंडोशी, ओंड  यासह विभागात आहे.

हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून हा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी शेतकरी शक्य तेवढा प्रयत्न करत आहेत. पण हुमणीचा नायनाट होत नाही. तो नायनाट करण्यासाठी सध्या शेतकर्‍यांना रासायनिक औषधाचा  वापर हुमणीसाठी केला जात असून त्याचा प्रभावही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकरी या रासायनिक औषधांची फवारणी करून हुमणीचा नायनाट   करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकरी औषध फवारणी करून भांगलणीच्या वेळी जमिनीतील हुमणी हाताने भरून काढत आहेत. हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषध फवारणीसह  कसोशीने प्रयत्न करत आहे. पण त्याला अल्प यश येत आहे. शेतकर्‍यांनी यावर्षी खरीप हंगामासाठी एक हजार रुपये पायली या दराने भुईमूगाचे बियाणे खरेदी केले आहे. ऊस बियाणे, त्याबरोबर लागवडीसाठी मोठा खर्च शेतकर्‍यांनी केला असून यावर्षी पिकेही जोमाने आली आहेत. पण हुमणी किडीने पीक नष्ट होते की काय अशी धास्ती शेतकर्‍यांच्या मनात निर्माण झाली असून शेतकरी पूर्ण हतबल झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. उंडाळेच्या शेतकरी कृषी व कृषी पदवीधर विकास संस्था व संस्थेचे संस्थापक विनायक पाटील यांनी याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून हुमणी नियंत्रणासाठी करण्यात येणारे उपाय सुचवले आहेत.

नांदगाव, उंडाळे या विभागात शेतकर्‍यांना हुमणी नियंत्रणासाठी रासायनिक औषधे वापरून हुमणीचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला काही प्रमाणात यशही आले असून तेजदीप कृषी शेतकरी व कृषी पदवीधर संस्था, उंडाळे अध्यक्ष विनायक पाटील यांच्यावतीने विविध उपाय सांगितले जात आहेत. सध्या शेतकर्‍यांना हुमणीसाठी रासायनिक औषध आता अधिक प्रभावी वाटत आहे.

शेतकर्‍यांसमोर खरिपातील भुईमूग व आडसाली ऊस, भाजीपाला अन्य  पिकांवर यावर्षी हुमणीचे नवे संकट आले आहे. मोठा खर्च करून केलेली पेरणी, टोकणी हुमणीमुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!