स्थैर्य, मुंबई, दि.१२: कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांदरम्यान तिस-या टप्प्यात स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आले. यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने व त्यानंतर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनेही चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी केईएम आणि नायर रुग्णालयांना ‘आयसीएमआर’ची परवानगी मिळूनही लसीअभावी या चाचण्या रद्द होणार आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि भारतातील सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे लस बनवत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पहिल्या आणि दुस-या टप्प्यात लंडनमध्ये स्वयंसेवकांवर केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या. मात्र, तिस-या आणि अंतिम टप्प्यात मानवी चाचण्या सुरू असताना स्वयंसेवकांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे या चाचण्या बुधवारी तात्काळ बंद करण्यात आल्या.
त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटनेही देशभरातील चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात होणा-या मानवी चाचण्या होण्याआधीच रद्द झाल्यात जमा आहे. भारतात दुस-या आणि तिस-या टप्प्यातील मानवी चाचण्या होणार होत्या. मात्र, आता या दोन्ही टप्प्यातील चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.
केईएममध्ये १६० तर नायरमध्ये १०० चाचण्या होणार होत्या तर देशभरात १७ केंद्रांवर एकूण १६०० चाचण्या होणार होत्या. पुण्यात दोन स्वयंसेवकांवर याची चाचणी झाली होती.