
दैनिक स्थैर्य | दि. 31 मार्च 2025 | फलटण | ‘‘आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांना व अभिष्टचिंतन सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हे चित्र पाहून विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आहे’’, अशी टिका राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, ‘‘आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यात विविध उपक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यासही तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते लक्षणीय संख्येने उपस्थित राहिले होते. गत काही दिवसांमध्ये राजे गटात मोठे झालेले काही नेते विरोधी गटात गेल्याने विरोधकांना आसूरी आनंद झाला होता. मात्र नेते जरी दुसर्या गटात गेले असले तरी कार्यकर्ते मात्र आ. श्रीमंत रामराजे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत; हे यावरुन अधोरेखित झाले आहे.’’
‘‘यापूर्वी विरोधकांनी घडसोली मैदानावरुन राजे गटावर केलेले आरोप खोटे ठरले होते आणि आता श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीचा त्यांनी खेळलेला कुटील डावही उधळला गेला आहे. कारखान्याच्या निकालाचा धक्का ताजा असनाताच अभिष्टचिंतन सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधक पुन्हा एकदा हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. ही केवळ एक झलक आहे. येत्या काळात त्यांना आ.श्रीमंत रामराजे यांचा करिष्मा अजून नक्कीच बघायला मिळेल’’, असा इशाराही प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.