दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । कोरेगाव । कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात रात्रभर पडलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार झालेल्या पावसाची भागात शंभर मि.मीटर पाऊस नोंद झाली आहे. ज्वारी भुईसपाट, तर घेवडा कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
पेरणीनंतर पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी देऊन पिके जगवली होती. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने उंच वाढलेली ज्वारी भुईसपाट झाली. यंदा मोठ्या प्रमाणात केलेला वरूण घेवडा सध्या फुलात आहे. पावसाने फुल गळ झाली असून शेतात पाणी साठल्याने पिक कुजण्याचा धोका आहे. पाऊस, ढगाळ वातावरण, धुके व थंडी अशा प्रतिकूल वातावरणाचा उत्पादनाला फटका बसणार आहे. सर्कलवाडी, चौधरवाडी, वाघोली, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव येथे स्ट्रोबेरी पावसाने खराब झाली आहे. ऊसाचे फड भुईसपाट झाले आहेत. तरकारी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असून कृषी सेवा केंद्रावर औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. परतीच्या मॉन्सूनने हुलकावणी दिल्याने या भागात पाणी टंचाईचे सावट होते. परंतु रात्रीच्या पावसाने ओढे-नाले ओसंडून वाहिले.