भरलेला घडा शांत असतो तर अर्धवट घडा अस्थिर राहतो. तुम्ही स्थिर राहायला शिका. एवढा अभ्यास करा की, स्पर्धा परीक्षेत आपल्या समाजाची मुलं-मुली अव्वल यायला हवीत आणि त्यांच्या नावाचा बोलबाला डीजेच्या आवाजापेक्षा दूरवर व्हावा, अशी अहिल्या जयंती मला अपेक्षित आहे. – प्रा. रवींद्र कोकरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त जमलेले श्रोते, उत्सव कमिटी व सूत्रसंचालक निलेश धापटे याचं प्रथम स्वागत करतो. तुम्हा सर्वांच्या विचाराला अभिवादन. ज्यांच्या विचारातून हिंदवी स्वराज्याची निर्मित झाली ते राजा शिवछत्रपती, त्यांनी जगावं कसं ते शिकवलं व मरावं कसं शिकवणारे धर्मवीर संभाजी महाराज, शिक्षणाची मुहूर्तमेढ रचणारे महात्मा जोतिराव फुले आद्य क्रांतिवीर तसेच सावित्रीबाई फुले, तसेच दीड दिवसांच्या शाळेत जाऊन १५० पुस्तके लिहिणारे अण्णाभाऊ साठे, ज्यांनी इंग्रजांना ‘पळो की सळो’ करून सोडले ते उमाजी नाईक, ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहून जगाचं ‘विश्वरत्न’ आणि भारतात ‘भारतरत्न’ ही पदवी ज्यांना बहाल झाली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा’ म्हणणारे सुभाषचंद्र बोस, सत्य आणि अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ म्हणणारे लोकमान्य टिळक, ‘इन्कलाब जिंदाबाद’ म्हणत फाशी जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व पोटचं पोर पाठीला बांधून ‘मैं मेरी झाशी नही दूंगी’ म्हणत लढणारी राणी लक्ष्मीबाई, राजारामानंतर गादीवर बसून चांगल्याप्रकारे राज्य कारभार चालवणार्या राणी ताराबाई या महाराष्ट्राच्या मातीला मोठं करणार्या सर्वच महापुरूषांच्या चरणी नतमस्तक होऊन व्याख्यानमाला आयोजित करणार्यांना धन्यवाद देतो.
क्रांती खर्या अर्थाने तलवारीने होते, क्रांती खर्या अर्थाने पेनाने होते आणि चांगल्या विचारांचा मेळ असेल तर क्रांती खर्या अर्थाने विचाराने होते. विचारांचा जागर झाला पाहिजे, हे तुम्हाला सूचलं या गोष्टीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विचारांचा जागर तरुणांच्या मनात होणे यासारखी दुसरी क्रांती नाही. विचारांचा जागर हा फटाक्यांच्या आवाजावर, डीजेच्या तालावर नाचून होण्यापेक्षा पुस्तके वाचून होणे अपेक्षित आहे. वाजायला लागल्यानंतर घुमायला लागणे हे प्रगतीचे लक्षण नसून मागासलेपणाचे लक्षण आहे. इतर समाजाचं अवलोकन केलं तर असं दिसून येत की, त्यांनी कोणतेही वाद्य न वाजवता, गाजावाजा न करता शांतपणे पुस्तके वाचून अभ्यास केला व इतरांवर राज्य केलं.
डीजेच्या तालावर थिरकणार्या तरुणांच्या आयुष्याचा तमाशा होतो. असं आयुष्य काय कामाचं? असं शिका, असं जगा की समाजबांधव तुमचा आदर्श घेतील. लक्षात घ्या आपण शेतकरी आहोत, जे पेरतो तेच उगवतो आणि उगवत असताना त्याचा आवाज होत नाही, पण उगवलेलं, मोठं झालेलं झाड मोडतं तेव्हा आवाज होतो. आवाजाने मोडू नका तर जीवनात कोणत्याही संकटाचा सामना शांतपणे व धैर्याने करा. भरलेला घडा शांत असतो तर अर्धवट घडा अस्थिर राहतो. तुम्ही स्थिर राहायला शिका. एवढा अभ्यास करा की, स्पर्धा परीक्षेत आपल्या समाजाची मुलं-मुली अव्वल यायला हवीत आणि त्यांच्या नावाचा बोलबाला डीजेच्या आवाजापेक्षा दूरवर व्हावा, अशी अहिल्या जयंती मला अपेक्षित आहे.कोणत्या समाजात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं, पण ज्याच्या नावात धनाचं आगर आहे असं समजलं जात त्या धनगर समाजाचा नावलौकिक आपल्या चांगल्या गुण कौशल्याने मोठा करा. धनगर म्हणजे संस्कार, संस्कृती, अतिथी, धन यांचं आगर. असा हा समाज शिकला पाहिजे. त्यासाठी मुलांना खूप शिकवा आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावोगाव अभ्यासिका सुरू करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी दर्शन रांगेपेक्षा वाचनालयाची रांग मोठी दिसेल, त्या दिवशी भारत हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. जगात पुण्यश्लोक म्हणून चार व्यक्तींचा उल्लेख केला जातो. त्यात तीन देव तर एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे आपली माता अहिल्यादेवी होय. अशा या अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचे वाचन घराघरातून झालं पाहिजे, ही खरी जयंती होईल.
महापुरूषांची चरित्रे वाचत असताना अभ्यासदेखील करायला हवा. लक्षात घ्या आपली मुले वरातीपुढे नाचणारी होण्यापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची परवानगी देणारी अधिकारी बनवा. लग्न जमावं म्हणून कोणाची चार रुपयांची नोकरी करण्यापेक्षा आपला व्यवसाय निवडा व त्यातून प्रगती करा. आपला स्वाभिमान जपा, लाचारी पत्करू नका. वटपौर्णिमेला झाडाची फांदी तोडून पूजा करण्यापेक्षा वडाची झाडे लावा, त्याची पूजा करा. एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य द्या. यापेक्षा वेगळी नाती-गोती नसतात. जयंत्या साजर्या करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या. प्लास्टिकच्या फुलांचा वापर करू नका. आपलं पर्यावरण आपण जपूया, हा संकल्प करा.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणे म्हणजे डीजे लावून भंडारा उधळणे नव्हे किंवा त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सनावळया यांची उजळणी करणे नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेऊन घराघरात अहिल्या तयार करणे होय.
हे सांगत असताना सरांचा स्पष्टवक्तेपणा जाणवला. ऐकणार्याला बरं वाटण्यापेक्षा खरं बोलणारा वक्ता असावा, हे त्यांच्या व्याख्यानावरून दिसून येतं. खरं तर १८ व्या शतकात मराठी साम्राज्याची धुरा सांभाळणारी अहिल्यादेवी होळकर बुद्धिमान व युद्धकलेत निपुण होती.
गनिमांच्या घोड्यांच्या टापाने आसमंतात उठलेले धुळीचे वादळ तिने तलवारीच्या टोकाने पत्र लिहून शांत केले. यावरून एकच म्हणता येईल.
‘आले किती, गेले किती, संपले भरारा…
अहिल्यादेवी होळकर नावाचा आहे हो अजून दरारा…’अन्न, वस्त्र व निवारा या जनतेच्या गरजा भागवण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी ठिकठिकाणी मंदिरे बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली. जातीभेदावर नियंत्रण ठेवून एक आदर्श समाजरचना त्याकाळी केली होती. हाती पिंड धारण केलेली त्यांची मूर्ती पाहिले की वाटतं भक्ती आणि शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन!
शब्दांकन – युवराज खलाटे
कांबळेश्वर (बारामती)