दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । फलटण । पुस्तकाची विक्री किती झाली याचा लेखकाशी फारसा संबंध नसतो, परंतू ते वाचून आपल्या प्रतिक्रिया किती वाचकांनी लेखका पर्यंत पोहोचविल्या हे लेखकांसाठी प्रेरणादायी असते आणि म्हणून प्रत्येकाने वेळ काढून डॉ. महेश बर्वे यांचे “कोलांट्या” हे पुस्तक वाचून आपल्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
डॉ. महेश बर्वे यांनी दैनंदिन जीवनातील विषयावर छोट्या कथा लिहुन एक प्रकारे समाज प्रबोधनाचा यशस्वी प्रयत्न “कोलांट्या” या पुस्तकाच्या माध्यमातून केला असून त्याचे प्रकाशनाचा शानदार सोहोळा हॉटेल अशोकाच्या सभागृहात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यावैभव प्रकाशनचे बकुळ पराडकर, डॉ. महेश बर्वे, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. विकास खटके व्यासपीठावर होते.
आपले वडिलांचे स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम कै. अच्युत दत्तात्रय बर्वे स्मृती हरित वसुंधरा उपक्रमांतर्गत डॉ. महेश बर्वे यांनी हाती घेतले असून फलटण शहराच्या परिसरात विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात ते व्यस्त असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत डॉ. अविनाश पोळ आणि डॉ. महेश बर्वे यांच्या प्रमाणेच पर्यावरण संतुलनासाठी ध्यास घेऊन काम करणाऱ्या ५० जणांची एक टीम तयार करुन त्यांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यात वृक्षारोपण आणि पर्यावरण संतुलनाची मोहिम राबवून सातारा जिल्हा प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण एकाद्या चांगल्या कामात लक्ष घातले तर त्याचा ध्यास घेऊन ते पूर्णत्वास नेत असल्याचे सांगत आपण राजकारणाचा ध्यास घेऊन काम केले त्यातून संपूर्ण सातारा जिल्ह्याचे राजकारण योग्य पद्धतीने करुन सर्वांना दिलासा देण्यात यशस्वी झालो, त्यानंतर दुष्काळी पट्टयात पाणी पोहोचवून तेथील शेती शेतकरी सुखी समाधानी करण्याचा ध्यास घेतला कृष्णेचे पाणी राज्याच्या दुष्काळी पट्टयात पोहोचविण्यासाठी ध्यास घेऊन काम केले आणि यशस्वी झालो आता पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतला आहे त्यामध्ये निश्चित यश प्राप्त करण्याची खात्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
अमाप वृक्षतोड, पेट्रोल, डिझेलचा वारेमाप वापर आणि पर्यावरणाची हानी करणारे उपक्रमातून संपूर्ण जगावर मोठी आपत्ती आली असून सन २०५० पर्यंत येथील जीवसृष्टी संपुष्टात येण्याचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य शासन किंवा अन्य कोणावर जबाबदारी सोपवून निर्धास्त राहण्याचा हा विषय आता राहिला नाही तर प्रत्येकाने यामध्ये काम करुन पर्यावरण हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या चळवळीत झोकून देवून काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र विधी मंडळाच्या माध्यमातून दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांना एकत्र करुन त्यांना पर्यावरण संतुलन तातडीने आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी दोन्ही सभागृहात सदस्यांच्या दोन स्वतंत्र समित्या स्थापन करुन लोक प्रतिनिधींना या क्षेत्रात आपापल्या भागात काम करण्यासाठी सतत प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण शहर व तालुका हरित करायचाच असा निर्धार व्यक्त करीत, फलटण हरित होईलच याची ग्वाही देत आगामी काळात तालुक्यातील फलटण शहरासह प्रत्येक गावात ५० तरुणांची एक सक्षम टीम तयार करुन गावागावात वृक्षारोपण आणि पर्यावरण संतुलन प्रक्रिया प्रभावी रीतीने राबविण्याचे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
बर्वे कुटुंबीय आणि राजघराण्याचे अनेक दशकांपासून दृढ संबंध आहेत तथापि मुधोजी क्लब मध्ये दर्जेदार टेनिस कोर्ट उभारण्याच्या कामातून आपला डॉ. महेश बर्वे यांच्याशी संपर्क आला तो वृक्षारोपणामुळे अधिक झाल्याचे नमूद करीत त्यांनी फलटण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केल्याचे निदर्शनास आणून देत या उपक्रमाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. महेश बर्वे यांचे अभिनंदन केले.
कोलांट्या या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. बर्वे यांनी दैनंदिन जीवनातील गोष्टी सहज स्वरुपात शब्दबध्द करताना एकप्रकारे समाज प्रबोधन केले म्हंटले तर वावगे होणार नाही अशी त्याची रचना असून याला साहित्य कृती म्हणता येईल की नाही माहीत नाही परंतू सहज, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी केलेले प्रबोधन उत्कृष्ट साहित्य निर्मितीच आहे असे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
करोना काळात व्हॉट्स ॲप वर येणारा मजकूर पाहुन आपणही काही लिहावे असे वाटले, लिहीत गेलो, त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याने उत्साह वाढला, अधिक लिखाण झाले, त्यातून मित्र मंडळींच्या आग्रहाखातर तेच लिखाण पुस्तक रुपाने आपल्या हातात देण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करताना भावले तर जरुर वाचा, काही चुका असतील तर माफ करा असे सांगत डॉ. महेश बर्वे यांनी श्रीमंत रामराजे व राजघराण्यातील सर्वच मान्यवर आणि फलटणकर या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. विकास खटके यांची समयोचीत भाषणे झाली
बकुळ पराडकर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात पुस्तकाविषयी विवेचन केले, सौ. अश्विनी बर्वे राव यांनी सूत्र संचालन आणि डॉ. सौ. प्राची बर्वे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास बर्वे कुटुंबीयांसह शहरातील डॉक्टर्स, वकील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शहरवासीय उपस्थित होते.