स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: दिल्ली सीमेवर
गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून
काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात
येत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र
सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘आणखी किती शेतक-यांना बलिदान द्यावं लागेल’
असा संतप्त सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर
अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या
शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावं लागेल?’ असा प्रश्न त्यांनी
केंद्र सरकारला विचारला आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या
आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतक-यांना आपला जीव गमावावा लागला आहे. राहुल
यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तन्ना
सिंह, जनकराज, गजन सिंह, गुरजंट सिंह, लखबीर सिंह, सुरेंद्र सिंह, मेवा
सिंह, राममेहर, अजय कुमार, किताब सिंह आणि कृष्ण लाल गुप्ता यांचा मृत्यू
झाल्याचं म्हटलं आहे.