दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2023 | सातारा | रात्रीच्या वेळी होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नूतन आदेश पारित केले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व हॉटेल व तत्सम आस्थापना यांना रात्री १० वाजता आपले हॉटेल बंद करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासोबतच हॉटेल १० वाजता बंद केल्यानंतर रात्री ११ वाजून ३० वाजेपर्यंत सर्व संपूर्ण आस्थापना बंद करण्यात यावी; असे न झाल्यास संबंधित हॉटेल व तत्सम आस्थापना यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
रात्रीच्या वेळेस हॉटेल, ढाबे हे निर्धारीत वेळेपेक्षा जास्त कालावधीसाठी चालु असल्यामुळे अशा वेळी मद्यपी व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार, कायदा व सुव्यवस्था प्रश्न यासह तणावाच्या घटना अथवा अन्य गुन्हेगारीचे प्रकार घडण्याची दाट शक्यता असते. अशा घटनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने हॉटेल, ढाबा आस्थापनांनी त्यांची हॉटेल्स व ढाबे हे रात्री १०.०० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास हरकत नसावी आणि आस्थापना रात्री ११.३० वाजता बंद करण्यात यावी; असे आदेश सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिलेले आहेत.
महाराष्ट्र शासन, गृह विभाग (विशेष), मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक – आरईएच २०११/ १०६/विशा-५, दिनांक ०३/१२/२०११ अन्वये सदरील सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सातारा जिल्हयातील सर्व हॉटेल्स, ढाबे आस्थापनांनी आपल्या आस्थापना विहित वेळेत बिनचुकपणे बंद ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. वरील नमुद कालमर्यादेचे उल्लघन झालेस संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी; असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.