
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : निसर्गसंपन्न अशा कास परिसरात अनेकांनी येथे येणार्या पर्यटकांच्या सोयीच्या नावाखाली अधिकृत आणि अनधिकृत अशी भव्य हॉटेल्स, रिसॉर्ट सर्व नियम धाब्यावर बसवत उभारली आहेत. आता या हॉटेल चालकांकडून कास परिसरातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या जंगलातहॉटेलचा कचरा टाकण्यात येत असून, अशा हॉटेलवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नोटिसांद्वारे देण्यात आला आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असून, त्यातील कचरा जंगल क्षेत्रात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांना वन विभाग सातारा परिमंडळ रोहोट यांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे.
जंगल क्षेत्रात कचरा टाकल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रोहोट परिमंडळाचे वनपाल राजाराम काशीद यांनी दिला आहे. कास पठार परिसरात जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यावसायिक त्यांच्याकडील प्लॅस्टिक व इतर कचरा सरळ सरळ जंगलात आणूनटाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांच्या अन्नसाखळीतही बाधा निर्माण होत आहे.
जंगलात टाकलेला कचरा वन्यप्राणी खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता वाढते, तसेच मानवनिर्मित पदार्थ खाल्ल्याने काही प्राणी मानवी वस्त्यांकडे वळले असून, मानव व वन्यप्राणी संघर्ष वाढताना दिसत आहे. त्यामुळे अशा हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

