दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । फलटण । किशोर-किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघानी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर, विदर्भनेही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या मुले व मुलींचे शेवटचे साखळी सामने मॅटवर झाले.
मुलींनी केरळला १२-६ असे डावाने नमविले. यात प्राजक्ता बनसोडे व संचीता गायकवाड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करीत अनुक्रमे १.४० व नाबाद १.३० मिनिटे पळती केली. विद्या तामखडे, धनश्री तामखडे व मैथली पवार यांनी प्रत्येकी २.३० मिनिटे संरक्षण केले. धनश्री कंक हीने नाबाद २ मिनिटे पळती केली. दुसऱ्या सामन्यात विदर्भने छत्तीसगडवर १३-११ अशी डावाने मात केली.
महाराष्ट्राच्या मुलांनी ओरिसाचा १६-५ असा डावाने धुव्वा उडविला. त्यांच्या हारद्या वसावे याने ६.२० मिनिटे संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळीत आक्रमणात २ गडी टिपले. जितेंद्र वसावे (३.१० मिनिटे व २गुण), वेदांत इनामदार (२.०० मिनिटे), सोट्या वळवी (४ गुण) यांनीही संघाच्या विजयात साथ दिली.
कोल्हापूरने तेलंगणाचा, विदर्भने राजस्थानचा पराभव केला.