दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । मुंबई । अमरावती जिल्ह्यातील उमरखेड, नागपूर जिल्ह्यातील ढीवरवाडी, वर्धा जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणाच्या सिट्रस इस्टेटविषयी कार्यवाहीच्या प्रगतीसह फलोत्पादन विभागाचा सविस्तर आढावा रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला.
फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या ब्रह्मगिरी या शासकीय निवासस्थान येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. के.पी.मोते यावेळी उपस्थित होते.
मोसंबी फळपिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी तालुका फळरोपवाटिका-पैठण, जि. औरंगाबाद या फळरोपवाटिका प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानावर आधारित फळरोपवाटिका स्थापन करुन या प्रक्षेत्रावर मोसंबीचे जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे, मोसंबी फळपिकाच्या शास्त्रोक्त लागवड पध्दतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना कीड-रोगमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात किफायतशीर दराने उपलब्ध करुन देण्याविषयाच्या कामांची माहिती श्री. भुमरे यांनी घेतली.
उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटीकांची स्थापना, प्रशासकीय इमारत, कार्यालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र इ. बांधकामाची माहितीही घेतली. तसेच कलेक्शन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंग, साठवणूक युनिटी स्थापना याविषयी चर्चा केली. अवजारेबँक स्थापना, पाणी, माती, पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादन, संत्रा वाण विकसित करणे, शेतकरी प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आदी विविध विषयाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.