स्थैर्य, फलटण, दि. २६: महानुभव पंथाची दक्षिण काशी समजले जाणाऱ्या फलटण येथील असणारी घोड्याची यात्रा या वर्षी कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे रद्द करण्यात आलेली आहे. महानुभाव पंथाची दक्षिण काशी समजली जाणारी घोड्याची यात्रा प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून यात्रा दरवर्षी पाच दिवस चालते रोज रात्री ८ वाजता श्री कृष्ण मंदिर येथून छबीना निघून श्री आबासाहेब मंदिर येथे रात्री ११ वाजता येतो व आरती होऊन समाप्त होतो. यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी १ वाजता श्री आबासाहेब मंदिर येथून छबीना निघून शहर प्रदक्षणा करून रात्री ८ वाजता मंदिरामध्ये येतो व आरती होऊन समाप्त होतो. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये प्राचीन काळापासून मनुष्य जीवनात असणाऱ्या भीती भूत बाधा व अनेक रोगांचे निवारण नष्ट होते, अशी भावना भक्तांची असते त्यामुळे यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यातून लाखो भक्त फलटणमध्ये यात्रेसाठी येतात.
गेल्या वर्षी यात्रा कोरोनामुळे मुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. कोरोनाची महामारीमुळे या वर्षी सुद्धा घोड्याची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सर्व भक्तांनी आपल्या घरातच श्री चक्रधर स्वामी, भगवान श्रीकृष्णकडे प्रार्थना करावी या महामारी मधून आपल्या देशासह जगाची सुटका लवकरात लवकर व्हावी, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष परम पूज्य आचार्य श्री श्यामसुंदर विद्वांस बाबा यांनी केलेले आहे.