
स्थैर्य, फलटण, दि. 8 मार्च : सत्तेचा गर्व डोक्यात न जाऊ देता, तालुक्याच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने घाम गाळणाऱ्या जुन्या-जाणत्या नेत्यांचा सन्मान कसा करावा, याचा आदर्श वस्तुपाठ आज फलटणकरांनी अनुभवला. फलटणच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मोलाचे योगदान देणारे माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र रघुनाथराव भोईटे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त फलटण-कोरेगावचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी भोईटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
दिग्गजांची उपस्थिती आणि जुन्या आठवणींना उजाळा
या अभिवादन प्रसंगी डॉ. भोईटे यांचे सुपुत्र ॲड. नरेंद्र (राजाभाऊ) कृष्णचंद्र भोईटे, नगरसेवक अशोकराव जाधव, फलटण तालुका संघर्ष समितीचे संस्थापक ॲड. नरसिंह निकम, राजाभाऊ नागटिळे आणि ॲड. अनिल फाळके या दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सचिन पाटील आणि उपस्थित मान्यवरांनी स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. फलटण तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांचे निस्वार्थी राजकारण आणि त्यांची दूरदृष्टी आजच्या पिढीसाठी कशी दिशादर्शक आहे, यावर आमदार पाटील यांनी कृतज्ञतापूर्वक भाष्य केले.
राजकारणात केवळ सत्ता मिळवणे महत्त्वाचे नसून, माणसांशी जोडलेली नाळ आणि जुन्या पिढीचा आदर राखणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असते, हे या निमित्ताने फलटणकरांना पाहायला मिळाले.
