
दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
‘जागतिक महिला दिन’ हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी ८ मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जातो. तसेच लिंग समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. ‘जागतिक महिला दिन’ हा दिवस आज समाजात महिलांचा सत्कार करून साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलटणच्या वतीने ऊसतोड महिला कामगार यांच्या पालावर जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कष्टकरी ऊसतोड महिला या समाजातील मान-सन्मानापासून कायमच उपेक्षित असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रसंगी स्वतःचे घरदार सोडून येणार्या माता-भगिनी आपल्या कुटुंबाचा संसाराचा गाडा पहाटे ३ वाजल्यापासून हाकत असतात. ऊस तोडीसारख्या कष्टप्रद काम करणार्या तसेच ऊन, वारा, थंडी कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र काबाडकष्ट करणार्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करून एक आगळा वेगळा महिला दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरा केला.
स्त्री आपले मूल संस्कारशील, अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मूल पोटात वाढविण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्रीविना तक्रार पार पाडते. त्यामुळेच साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरूष घडले. प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते. ती संकटात पुरुषाची ढाल बनत असते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निलेश जगताप, अभिषेक गाडे, सूरज जगताप, ऋषिकेश जगताप, ज्ञानेश्वर चौधरी, व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.