1971 च्या युद्धातील माजी सैनिकाचा सन्मान युवा पिढीला प्रेरणादायी – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । सातारा । 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आज सुवर्णमहोत्सव. या युद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिकाचा सन्मान करण्यात येत आहे. हा सन्मान सोहळा युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज 1971 च्या भारत पाक युद्धात सहभाग घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा महाराष्ट्र माजी सैनिक पेन्शनर्स संघटना, इंडिया एक्स सर्व्हिसेस लीग डिस्ट्रक्ट सेंटर, कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक व सरस्वती सैनिक महिला बचत गट महाराष्ट्रराज्य यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माजी ब्रिगेडियर मोहनराव निकम, निवृत्त कॅप्टन यु.आर. निकम यांच्यासह सैन्य दलातील माजी अधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी देशामध्ये अनेक ठिकाणी सैनिक स्कूलची निर्मिती  केली. त्यामध्ये सातारा येथे सैनिक स्कूल झाले. या स्कूलमधले अनेक विद्यार्थी सैन्यदलात मोठ्या पदावर काम करीत आहे. या सैनिक स्कूलच्या विकासासाठी शासनाने निधी दिला असून विकास कामांचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.

सैन्य दलातील निवृत्त झालेला सैनिक हा शिस्तप्रिय असतो  माजी सैनिकांना मुळ प्रवाहात आणण्याचे काम कर्नल आर.डी.  निकम यांनी केले. माजी सैनिकांच्या ज्या अडचणी असतील त्या शासनामार्फत सोडविल्या जातील, असे आश्वासनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांची मुले केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेऊन सैन्य दलात सेवा करतील यासाठी केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याची सैन्य परंपरा पुढेही चालू राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये 1971 च्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैन्यदलातील माजी अधिकारी, माजी सैनिक यांनी युद्धातील अनुभव सांगितले.


Back to top button
Don`t copy text!