स्थैर्य, फलटण, दि. ११ : नगरसेवक व पत्रकार अजय माळवे यांनी करोना नियंत्रण कामात झोकून देऊन केलेले काम, राबविलेले विविध उपक्रम आणि लॉक डाऊन, सोशल डिस्टनसींग, मास्क वापर, गर्दी टाळणे याबाबत शासन/प्रशासनाच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी केलेले जनप्रबोधन यासाठी कृषी क्षेत्रातील येथील अग्रगण्य कंपनी के. बी. एक्स्पोर्टनें त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविले आहे.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यवसाय बंद पडल्याने, रोजगाराची संधी गमावलेले, मोलमजुरी पासून वंचीत झालेले समाजातील विविध घटकांना जीवनावश्यक वस्तू किट वितरण, अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेलेल्यांना दोन वेळचे जेवण देणे किंवा संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने जंतू नाशक फवारणी, अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे संपूर्ण प्रभागात मोफत वितरण, गरजूंना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करुन देणे, प्रभागातील सर्व नागरिकांची बाजार समिती फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार आदी लोकोपयोगी कार्यक्रम, उपक्रमांची नोंद घेऊन त्यांना हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल्याचे के. बी. एक्स्पोर्टचे संचालक सचिन यादव यांनी सांगितले.
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाषराव भांबुरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.