स्थैर्य,हैदराबाद,दि ४: चीनविरुद्ध १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या माजी जवानावर आज रिक्षा चालवून पोट भरण्याची वेळ आली आहे. ५० वर्षांपूर्वी बलाढ्य चीनचा सामना करणारे शेख अब्दुल करीम आज परिस्थितीशी दोन हात करत आहेत. विशेष म्हणजे करीम यांना युद्धातल्या कामगिरीसाठी स्टार मेडल देऊन गौरवण्यात आलं होतं. मात्र आज वयाच्या ७१ वर्षी त्यांना रिक्षा चालवून कुटुंबाचं पोट भरावं लागत आहे. करीम यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.
अब्दुल करीम यांचे वडील ब्रिटिशांच्या लष्करात होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी भारतीय लष्करात सेवा दिली. त्यांच्या निधनानंतर १९६४ मध्ये अब्दुल करीम लष्करात भरती झाले. ‘१९७१ च्या युद्धात माझा सहभाग होता. मी लाहौल क्षेत्रात तैनात होतो. त्यावेळी केलेल्या कामगिरीबद्दल माझा स्टार मेडलनं सन्मान करण्यात आला होता.. १९७१ मला विशेष पुरस्कारदेखील दिला गेला,’ असं अब्दुल करीम यांनी सांगितलं.
‘इंदिरा गांधींचं सरकार असताना अधिकचं सैन्य कमी करण्यात आलं. त्यामुळे अनेक सैनिकांना लष्करातून बाहेर पडावं लागलं. त्यातला मीदेखील एक होतो. लष्करात असताना मी सरकारी जमीन मिळावी यासाठी अर्ज केला होता. तेलंगणातल्या गोलापल्ली गावात मला ५ एकर जमीन देण्यात आली,’ असं करीम यांनी सांगितलं.
मला देण्यात आलेली जमीन २० वर्षानंतर सात गावांच्या लोकांमध्ये वाटली गेली आहे. मी अनेकदा तक्रारी केल्या. त्याच सर्वेक्षण संख्येच्या अंतर्गत मला पाच एकर जमीन देण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण मूळ जमीन देण्यास नकार दिला गेला. मला आजतागायत जमिनीची कागदपत्रं दिली गेलेली नाहीत, अशी व्यथा करीम यांनी मांडली.