उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून भक्ती सेवेचा सन्मान

हजारो कीर्तनकारांना दिले गौरवाचे पत्र


दैनिक स्थैर्य । 28 जून 2025 । फलटण । वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक सेवेला अभूतपूर्व सन्मान देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संप्रदायातील हजारो मान्यवर कीर्तनकारांना गौरवपत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी वारकरी परंपरेतील कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन यासारख्या भक्तीमूल्यांना शासनस्तरावर सन्मान मिळवून दिला असून पालखी सोहळ्यात या गौरवपत्राची चर्चा होताना दिसत आहे.

वारकरी संप्रदायातील पायी दिंडीत सहभागी सेवाधारी कीर्तनकारांना हे पत्र मिळाले असून, त्यांच्यासह राज्यभरातील हजारो हरिभक्तांना या गौरवाचा भागीदार होता आले आहे. ही बाब वारकरी संप्रदायासाठी अत्यंत गौरवाची असून शासनाशी असलेले वारकर्‍यांचे अतूट नाते अधिक दृढ झाले असल्याचे मत भागवत महाराज चौरे यांनी व्यक्त केले आहे.

पत्रात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात, आपण आपल्या आयुष्याचा यज्ञ हरिसेवेस अर्पण केला आहे. आपण समाजाला संतांचे तत्वज्ञान, भक्तीचे मूळ आणि जीवनाचे खरे समाधान शिकवत आहात. संत परंपरेचा वारसा पुढे नेणार्‍या प्रत्येक कीर्तनकाराच्या सेवेला मी वंदन करतो .

पंढरपूर वारीच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या जीवनात अध्यात्माचे तेज फुलवणार्‍या या संप्रदायातील सेवाव्रतींना शासनाने दिलेला हा सन्मान केवळ पत्रापुरता मर्यादित नसून, ही एक ऐतिहासिक नोंद ठरणार आहे, असे मत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर यांनी व्यक्त केले.

वारकरी संप्रदायातील सकल कीर्तनकारांना मिळालेल्या या गौरवामुळे, भक्ती, सेवा आणि परंपरेच्या या अखंड व अविरत प्रवासाला शासनाचे पूर्णतः सहकार्य लाभल्याचे स्पष्टपणे मत संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!