स्थैर्य, फलटण दि.10: येथील श्रीमती सिंधू रामचंद्र देवकाते व कै. रामचंद्र गुणाजी देवकाते यांना पुण्यातील सुसंगत फाऊंडेशनच्या वतीने आदर्श माता पिता पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात पुरस्काराचे वितरण नुकतेच सेवानिवृत्त जिल्हाधिकारी व साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते व जेष्ठ साहित्यीक व विचारवंत ज्योतीराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी राजेश बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कै.रामचंद्र गुणाजी देवकाते यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर नोकरी करत असताना त्यांचे निधन झाले. श्रीमती सिंधू रामचंद्र देवकाते यांनी या धक्कयातून सावरत मुलांच्या भवितव्याचा विचार करत पतीच्या जागेवर कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी केली.पतीच्या निधनानंतर खंबीरपणे उभे राहून त्यांनी तीनही मुलांना चांगले शिक्षण दिले. आज तिनही मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत. मोठा मुलगा डॉ.किरण देवकाते महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी वर्ग एक या पदावर कार्यरत आहे. मुलगी डॉ.शुभांगी देवकाते डॉक्टर झाली असून तिनेही वडूज येथे दाताचा दवाखाना सुरू केला आहे. तिसरी मुलगी स्वप्नाली देवकाते पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सुसंगत फाऊंडेशने त्यांना राज्यस्तरीय आदर्श माता पिता पुरस्काराने गौरविले आहे.
यावेळी प्रास्ताविक सुसंगत फांऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुधाकर न्हाळदे यांनी, सुत्रसंचालन प्रा. सुनील धनगर यांनी व आभार सौ.संगिता न्हाळदे यांनी मानले. पुरस्कार मिळालेबद्दल श्रीमती सिंधुताई देवकाते यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.