स्वातंत्र्यपूर्वकालीन पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता, समाज जीवनामध्ये आपला ठसा उमटवून आहे. सद्य:स्थितीतील पत्रकारिता करताना निश्चितच काटेरी वाटेवरून चालावे लागत आहे; परंतु पत्रकारितेतील गेल्या तीन पिढ्यांतील पत्रकारिता साकारणारे व अनुभवणारे आमचे गुरूवर्य अरविंदभाई मेहता यांनी फक्त फलटणपुरतीच नव्हे तर महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल, अशी पत्रकारिता गेल्या ५० वर्षांमध्ये नि:स्वार्थीपणे व सचोटीने साकारली आहे. त्यांना राज्यातील विविध संस्था व पत्रकारितेतील राज्यस्तरीय संघटनांकडून यथोचित गौरविले गेेले आहे. ३ ते ४ उत्कृष्ठ व आदर्श पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अरविंदभाई मेहता यांच्याबरोबरच फलटणच्या पत्रकारितेचाही हा गौरव म्हणावा लागणार आहे. अरविंदभाई मेहता यांची पत्रकारिता एक वेगळा आलेख असून महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील ते मानबिंदूच ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्रकारितेतील जीवनाविषयक घेतलेला आढावा…
पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्त्व
काही माणसे जन्माला येतात ती पर कर्तव्यपूर्तीसाठी. जे आपले नाही, आपल्या संबंधीही नाही परंतु सर्व समाजाच्या भल्याचे आहे, त्यातून समाजाचे चांगले होणार असते, अनेकांना त्यातून आनंद मिळणार असतो, भले त्यातून स्वत:ला दु:ख झाले तरी चालेल; परंतु इतरांना आनंद होतो आणि त्यांना मिळणारा आनंद आपला मानून झपाटून समाजकार्य करणारी काही व्यक्तीमत्त्व असतात. त्यातीलच एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून अरविंदभाई मेहता यांचे नाव सर्वांना घ्यावेच लागेल. महाराष्ट्रामध्ये फलटणच्या पत्रकारितेचे नाव गौरवाने घेतले जाते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार कै.हरिभाऊ निंबाळकर यांनी संघटनात्मक कार्यातून फलटणच्या पत्रकारितेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. अरविंदभाई मेहता यांनी कै. हरिभाऊ निंबाळकर यांच्या पत्रकारितेतील अंतर्गत निवडणुकांमध्ये पुढाकार घेवून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. अरविंदभाई मेहता यांच्या लिखाणाची संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत जवळून ओळख आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास सर्वच नावाजलेल्या दैनिकांमध्ये लिखाण केले आहे.
वास्तववादी लिखाण
अरविंदभाई मेहता यांच्या ५० वर्षांच्या पत्रकारितेमध्ये त्यांना अत्यंत जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. इयत्ता १२ वीमध्ये असताना मी कै.हरिभाऊ निंबाळकरांच्या ‘शिवसंदेश’ या दैनिकाच्या प्रेसमध्ये माझ्या स्वत:च्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यावेळी फलटण व सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांचा शिवसंदेशच्या कार्यालयात राबता होता. अशा मोठ्या माणसांना कै.हरिभाऊ निंबाळकर व अरविंदभाई मेहता यांचे मार्गदर्शन घेताना पाहिले आहे. अनेक मोठी माणसे ज्यावेळी मेहता साहेबांना आदराने नम्रतापूर्वक नमस्कार करायची, त्यावेळी मला प्रश्न पडायचा. परंतु या प्रश्नांची सारी उत्तरे त्यांच्या सहवासातून मला मिळून गेली. अरविंदभाई मेहता यांचे पत्रकारितेतील लिखाण हे एक मोठे गूढ वाटायचे. कारण त्यांच्या लिखाणाने आजपर्यंत कोणताही राजकारणी, समाजकारणी व अधिकारी दुखावलेला मला पहायला मिळाला नाही. याचा अर्थ ते विरोधात लिहीत नव्हते असा होत नाही, तर ते ज्याच्यावर लिखाण केले आहे त्याला दुखावण्याची कुठेही जागा शिल्लक ठेवत नव्हते. वास्तववादी लिखाण करून त्यांच्या चुका फक्त समजुतीने आपल्या लिखाणाद्वारे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिल्या आहेत. कोणत्याही प्रश्नांचा उहापोह न करता तो प्रश्न सोडविणे, हा प्रमुख उद्देश ठेवूनच त्यांचे पत्रकारितेतील लिखाण असते.
ऋषितुल्य पत्रकारिता
फलटण तालुक्यातील पत्रकारिता विस्तारित होत असताना अनेक दैनिके व साप्ताहिकांची निर्मिती झाली. राज्यातील अनेक दैनिके जिल्हास्तरावर आल्याने त्यांचे प्रतिनिधी निर्माण झाले. पत्रकारांची संख्याही त्यामुळे आपोआप वाढली. पत्रकारांच्या वाढत्या संख्येची अरविंदभाई मेहता यांनी कधीही प्रतारणा केली नाही. उलटपक्षी या क्षेत्रामध्ये नव्याने आलेल्या मुलांनाच त्यांच्या आदर्श पत्रकारितेची जरब असल्याने गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये कोणीही नवखा पत्रकार तयार झाला तरी अरविंदभाई मेहता यांच्या नि:स्वार्थी पत्रकारितेचा आदर्श घेवून उत्तमप्रकारे सकारात्मक पत्रकारिता करीत राहिला. यामुळेच फलटण तालुक्यातील पत्रकारितेचा एक आदर्श निर्माण झाल्याने नविन पिढीतील पत्रकारही आज ताठ मानेने समाजासमोर उभे राहताना दिसतात किंबहुना फलटण तालुक्यातील अनेक समाजोपयोगी, राजकारण विरहित बहुतांशी कार्यक्रम पत्रकारांना घेवून केले जातात. म्हणजे ही समाजाची विश्वासार्हता उभ्या महाराष्ट्रात किंचितच पहायला मिळते. याचे सर्व श्रेय गुरूवर्य अरविंदभाई मेहता यांनाच जाते. अरविंदभाई मेहता यांच्या पत्रकारितेतील लिहिणे, वागणे आणि बोलणे यामुळेच दोन पिढ्या सक्षम निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या नि:स्वार्थी आणि ऋषितुल्य पत्रकारितेचा आदर्श आम्हीही अंगिकारलेला आहे आणि येणार्या पिढीतही तो रुजविण्याचा आमचा प्रयत्न निश्चितच राहील.
१९७० च्या दशकामध्ये अरविंदभाई मेहता यांनी सुरू केलेली ‘पत्रकारिता’ ही पत्रकारिता या क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर सर्वस्पर्शी असलेल्या मेहता यांना हायटेक राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्य तळागाळातील लोक भेटू लागले. त्यामुळे साहजिकच फलटण मधील छोट्या, मोठ्या समाजाच्या संघटना, संस्था या आजही त्यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण करताना दिसतात. यामध्ये त्यांनी फक्त समाजहितच डोळ्यांसमोर ठेवले. त्यामध्ये कधीही राजकारणाचा शिरकाव होवू दिला नाही. त्यामुळे अनेक समाजातील अनेक लोक अरविंदभाईंचे नाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. यातून एक उत्कृष्ठ अशी समाजनिर्मिती करणारी तरुणांची फळी त्यांनी निश्चितपणे उभी केली आहे.
ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून भरीव कार्य
सन १९८५ साली ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवित १९८८ साली ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्षपद भूषविले व त्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. जिल्हाध्यक्षपदावर काम करीत असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ग्राहक पंचायतीचा मोठा दरारा निर्माण झाला. त्यामुळे अनेक पिडीत ग्राहकांना याचा लाभ झाला व चांगल्या व्यापाराचा पायंडा खर्या अर्थाने अरविंदभाई मेहता यांनी त्यावेळी घालून दिला. मोठमोठे राजकारणी व अधिकारीही फक्त चांगल्या गोष्टींना आपले बळ देत. सातारा जिल्हा ग्राहक मंचची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. त्यातूनच १९९५ साली त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. ते महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे राज्य सेक्रेटरी झाले. या पदाचा आदर करीत संपूर्ण राज्यभर फिरून अनेक ठिकाणी नवीन आगारांचे प्रस्ताव, प्रवाशांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच अनेक कामे पूर्ण केली. त्यामुळे फलटणच्या मातीचा डंका राज्यभर झाला. १९९६ साली शासकीय जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. सातारा जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे सदस्य या नात्याने सातारा हा न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांचा जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयाची इमारत सर्वप्रथम उभी राहिली पाहिजे यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्याचबरोबर राज्यातील सर्वच ग्राहक न्यायलय इमारतींसाठी केंद्र शासनाकडून २० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून घेण्यासाठीही अरविंदभाई यांनी यशस्वी प्रयत्न केले.
ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील अनेक गावात प्रशासन व सर्वसामान्य जनतेचा समन्वय घडवून प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, वीज मंडळ, पोस्ट ऑफिस, दूरध्वनी, कृषि, शिक्षण विभागाच्या अधिकार्यांसमवेत महिन्याच्या पहिल्या सोमवारी सायंकाळी ७ वाजता एका गावात ग्रामस्थांसमवेत बैठक घेवून, विविध खात्यांच्या योजनांविषयी माहिती देवून लाभार्थी निवड त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अरविंदभाई मेहता यांनी एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले. त्यावेळी स्कूटरसारख्या वाहनावर संपूर्ण तालुका पिंजून काढून अनेकांच्या प्रश्नांची सोडवणूक केलेली मी अनुभवलेली आहे.
ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक प्रबोधन मेळावे घेवून ग्राहकांच्या हक्काची माहिती व ते मिळविण्याविषयी करावयाचे प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. त्याचबरोबर जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांची तड लावण्यात यश प्राप्त केले. तसेच फलटण तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रासाठी (सबस्टेशन) शासकीय जागा उपलब्ध करून देणे, फलटण शहराबाहेरून जाणारा रिंगरोड, तालुक्यातील दूरध्वनी केंद्राची उभारणी आणि फलटणच्या दूरध्वनी केंद्रात अत्याधुनिक मशिनरीद्वारे क्षमतावाढ, शेतीपंपांना वीजजोडणी मिळण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करून जास्तीत जास्त शेतीपंपांसाठी प्रयत्न, खते, बी-बियाण्यांच्या अधिक दराद्वारे होणारी शेतकर्यांची नाडवणूक थांबवून रास्त दरात खते, बी-बियाणे उपलब्ध होण्यासाठी यशस्वी प्रयत्न, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती, वाड्यावस्त्यांवर वीज पोहचविणे यासह अनेक प्रश्नांची जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून सोडवणूक अरविंदभाई मेहता यांनी केली आहे.
एस.टी. प्रवाशांना दिलासा
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे राज्य सेक्रेटरी असताना राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून होणारी प्रवासी वाहतूक प्रवाशांच्या सोयीची होण्यासाठी जिल्ह्यातील विविध एस.टी. आगारांच्या वेळापत्रकात अमूलाग्र बदल करून प्रवाशांच्या सोयीनुसार एस.टी. बसेस सोडण्यात यश मिळविले होते. त्यावेळी वेळापत्रकाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला होता; परंतु संपूर्ण जिल्ह्याचे वेळापत्रक चपलख व सर्वमान्य असे बसविण्यात मेहता यांना यश आले. प्रवासी महासंघाच्या माध्यमातून औरंगाबाद येथे एस.टी.च्या विभाग नियंत्रकांपासून व्यवस्थापकीय संचालकपर्यंतच्या सर्व अधिकार्यांची एकत्र बैठक घेवून एस.टी.च्या कामकाजाचा आढावा घेतानाच प्रत्येक जिल्ह्यातील सद्य:स्थिती आणि प्रवाशांच्या सोयीसाठी करावयाच्या सुधारणांबाबत अनेक निर्णय घेण्यास एस.टी. प्रशासनास भाग पाडले. त्यातूनच महाराष्ट्रभर गाजलेल्या शटल बस सेवेसारख्या अनेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात अरविंदभाई मेहता यांचा मोठा वाटा आहे.
प्राणीमात्रावर दयाभाव
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांशी जोडले गेलेले अरविंदभाई यांनी धर्म व जातीभेद कधी मानला नाही. प्राणीमात्रावर दया केली पाहिजे, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या आशिर्वादाने व फलटण तालुका वारकरी सांप्रदाय संघटनेच्या माध्यमातून पिंपरद, ता. फलटण येथे गोपालन संस्थेची उभारणी करून त्यामाध्यमातून अनेक गायींना जीवदान दिले आहे, तर गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी अत्यंत कष्ट घेवून सर्व गुरांना जीवदान देण्याचे महान कार्य केले आहे. वारकरी सांप्रदायाबरोबर राहून फलटण तालुक्यामध्ये मेहता यांनी एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण केला असून मध्यंतरी ‘तुकाराम गाथा पारायण’ सारखा मोठा कार्यक्रम हाती घेऊन वारकरी सांप्रदायातील सहकार्यांच्या मदतीने उत्तमरितीने पार पाडल्याचा अनुभवही फलटणकरांसमोर आहे. तसेच आळंदी ते पंढरपूर अशी मानवी साखळी निर्मिती प्रसंगीही मोठ्या उत्साहाने सहभागी होवून ही मानवी साखळी यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे.
व्याख्यानमालेतून सक्षम पिढी निर्माण
शासकीय, प्रशासकीय, सामाजिक कार्यक्रमांबरोबरच ग्रामीण भागातील समाज सक्षम झाला पाहिजे, अधिकारक्षम झाला पाहिजे या विचारांनी पछाडलेल्या अरविंदभाईंनी संपूर्ण तालुक्यात ज्ञानाचे झरे कसे निर्माण होतील व तरुणांवर संस्कार होतील असे कार्यक्रम राबविण्याचा विचार करून त्यावर त्वरीत अंमलबजावणी सुरू केली. तालुक्याच्या ग्रामीण कानाकोपर्यातील गावांमध्ये व्याख्यानमाला सुरू करण्यास तरुणांना उद्युक्त केले आणि आजही अनेक गावांमध्ये या व्याख्यानमाला सुरू असून त्यातून अनेक सक्षम तरुणांची फळी निर्माण तर झालीच; परंतु व्याख्यानांमधून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वापर करून अनेक तरुण अधिकारी म्हणून आज महाराष्ट्रभर काम करताना दिसत आहेत.
फलटणमध्ये पत्रकार भवानाची निर्मिती
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना अत्यंत खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागते, म्हणून अशा जिज्ञासू व जिद्दी तरुणांना स्वत:ची अशी अभ्यासिका निर्माण व्हावी, या अरविंद मेहता यांच्या विचारानेच फलटण तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून कै.हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवनाची निर्मिती करून त्यामध्ये पत्रकार परिषदा व बैठका असे स्वरूप न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली. गेल्या दोन वर्षात यामधून अनेक अधिकारी घडले. हे सर्व यश फलटण तालुका व शहरातील प्रामुख्याने काम करणार्या पत्रकारांबरोबर अरविंदभाई मेहता यांच्या विचारांचे असून सर्वोच्च वैचारिक नि:स्वार्थी पत्रकारितेतील आम्हा तरुणांचे ते निश्चितच आदर्श आहेत.
राज्य पातळीवर पत्रकारितेसह समाजहितेशी संघटनांची राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अनेक पदे उपभोगली; परंतु या पदांचा वापर स्वार्थासाठी न करता समाजकल्याणासाठी अरविंदभाई मेहता यांनी केला. त्यांना तालुका, जिल्हा व महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये मोठे स्थान प्राप्त झाले आहे. या स्थानाचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी कधीही केला नाही. अरविंदभाई मेहता यांच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्याला एक द्रष्टा, प्रगल्भ बुद्धीमत्तेचा पत्रकार लाभला. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक पत्रकार घडले. त्यामुळे आज चांगल्या तरुण पत्रकारितेची फळी निर्माण झाली. ही फलटणच्या पत्रकारितेला मिळालेली देणगीच आहे.
– सुभाष भांबुरे
दैनिक नवराष्ट्र, नवभारत
फलटण तालुका प्रतिनिधी