स्थैर्य, फलटण, दि. १८: जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील शिंदेवाडी या गावाचे रहिवासी आणि मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले श्रीराम यादव यांची सहसचिव म्हणून पदोन्नती झाली आहे.
शिंदेवाडीसारख्या लहानशा गावाचे मूळ रहिवासी असलेल्या श्रीराम यादव यांचे प्राथमिक शिक्षण गावातच तर माध्यमिक शिक्षण फलटण येथे झाले. पुण्याच्या कृषि महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर १९९७ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास विभागात अवर सचिव म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
याच विभागांमध्ये कार्यरत असताना ते पदोन्नतीने उपसचिव झाले. राज्यात सुरू असलेल्या मुंबई व मुंबई बाहेरील विविध मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक आणि अशा विविध महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विशेषत: नगरविकास विभागात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. सिंगापूर व जपान या विविध देशांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांचा त्यांनी अभ्यास केला आहे. एकूण कामकाजाच्या कालावधीवर परिणाम न होता शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयासाठी श्री. यादव यांचे विशेष प्रयत्न होते. एक अभ्यासू आणि प्रशासकीय कार्यपद्धतीची अचूक जाण असणारे अधिकारी म्हणून श्री. यादव यांचा लौकिक आहे.
शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे त्यांना कायम मार्गदर्शन लाभले असून श्री. यादव यांच्या पदोन्नतीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.