हनीट्रॅप करून लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दापाश; सातारा तालुका डी.बी. पथकाची कारवाई 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०२: फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ओळख वाढवून भेटायला बोलवण्याच्या बहाण्याने हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटमार करणार्‍या टोळीचा सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी काजल प्रदिप मुळेकर वय 28 वर्षे रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली सध्या रा. सिंदवणेरोड, उरळीकांचन ता. हवेली, अजिंक्य रावसाहेब नाळे वय 23, वैभव प्रकाश नाळे वय 28 दोघे रा. रा. करावागज ता. बारामती अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी, 6 डिसेंबर 2019 रोजी ठोसेघर ता. जि. सातारा तसेच इतर ठिकाणी फेसबुक / व्हॉटस्अ‍ॅपद्वारे एका महिलेने ओळख करून एका व्यक्तीस भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यास अन्य साथीदारांच्या मदतीने मारहाण, दमदाटी केली. तसेच फोटो, व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देवून लुटमार केली होती. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला. या टोळीने बारामती, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी अनेक लोकांची अशा प्रकारे लुटमार केल्याची माहिती तपासात प्राप्त झाली. समाजामध्ये बदनामी होईल या भितीने संबंधितांनी तक्रारी केल्या नसल्याने ही टोळी निर्ढावली होती.

दरम्यान, या टोळीचा पर्दाफाश करण्याबाबत पोलीस अधीक्षक  अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलिस ठाण्याचे सजन हंकारे यांनी सातारा तालुका डी. बी. पथकातील उपनिरीक्षक अमीत पाटील व डी.बी. पथकास मार्गदर्शन केले. त्यानुसार या टीमने दहिवडी, पुसेगाव, बारामती, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी खबर्‍यांमार्फत माहिती मिळवून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य साथीदारांची माहिती प्राप्त झाली. त्या दोन साथीदारांनाही पुणे जिल्ह्यातून पथकाने ताब्यात घेतले. त्यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांना ताब्यात घेवून त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या टोळीने अशा प्रकारे अनेक ठिकाणी हनीट्रॅपद्वारे लुटमार केल्याचे समोर आले. या संशयितांना 4 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. तपास सजन हंकारे पोलीस निरीक्षक करीत आहेत.संबंधितांनी बदनामीच्या भितीने तसेच टोळीची दहशत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या नाहीत. ज्या कोणास अशाच प्रकारे फसवणूक होवून लुटमार झाली असेल त्यांनी फिर्यादी दाखल कराव्यात. अशा तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील व टोळीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि. सजन हंकारे, पो. उपनिरीक्षक अमित पाटील व सातारा डी.बी. पथकातील हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात व राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्‍वनाथ आंबाळे यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!