स्थैर्य, नागठाणे, दि.१६: आत्ताच्या मतलबी जगात दुसऱ्याची गोष्ट आपल्याला कशी मिळेल? अशी भावना मनात ठेवून वावरणारे अनेक आहेत.मात्र दुसऱ्याची सापडलेली वस्तू तेही रोख रक्कम मनात कोणतीही अभिलाषा न ठेवता प्रामाणिकपणे परत करणारी माणसेही आहेत.याचेच प्रत्यंतर शुक्रवारी सकाळी नागठाणे(ता सातारा) येथे दिसून आले.भररस्त्यात सुमारे १६ हजार रुपयांचे रोख रकमेचे बंडल येथीलच माजी सैनिकाने प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याला सुपूर्द करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला.हणमंत गणपती चंदूगडे असे या माजी सैनिकाचे नाव असून ते निवृत्त सुभेदार मेजर आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी हणमंत चंदूगडे यांना विकास सेवा सोसायटीसमोरील रस्त्यावर ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.त्यांनी ते मोजले असता ही रक्कम १६ हजार रुपये इतकी भरली.त्यांनी तात्काळ याची माहिती नागठाणे ग्रामपंचायतीत देऊन सदर रोख रक्कम ज्यांची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन केले.ग्रामपंचायतीनेही याबाबत गावात सांगितले.
दरम्यान, गावातीलच गणेश दत्ताजीराव नलवडे हे माहिती मिळताच ग्रामपंचायतीत पोहचले.सकाळी घाईगडबडीत त्यांच्याजवळील रोख रक्कम रस्त्यात पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी ग्रामपंचायतीने हणमंत चंदूगडे यांना ग्रामपंचायतीत बोलावून प्रत्यक्ष शहानिशा केली.यावेळी सदर रोख रक्कम गणेश नलवडे यांचीच असल्याची खात्री झाल्यावर हणमंत चंदूगडे यांनी ती त्यांच्या सुपूर्द केली.यावेळी सरपंच डॉ.सौ.रुपाली बेंद्रे,उपसरपंच अनिल साळुंखे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.हणमंत चंदूगडे यांच्या प्रामाणिकपणाचे गावकऱ्यांनी यावेळी कौतुक केले.
नागठाणे- गणेश नलवडे यांना त्यांची रोख रक्कम प्रामाणिकपणे परत करताना निवृत्त सुभेदार मेजर हणमंत चंदूगडे,सोबत सरपंच,उपसरपंच व सदस्य