स्थैर्य, सांतारा, दि.२४: कोरोना महामारीने सातारा जिल्ह्याला विळखा घातला असून हा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. महाराष्ट्रातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा सारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून साताऱ्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष घालावे. त्यांनी साताऱ्यात येऊन आढावा घ्यावा आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
गेले महिनाभर सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. आता उद्यापासून पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन असतानाही गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही मग आता या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये येईल, असे वाटत नाही. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये १४२३, पुणे जिल्ह्यात ९००, सोलापूरमध्ये १५३६, सांगलीमध्ये ११२६ तर कोल्हापूर जिल्ह्यात १७७४ च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले आणि सातारा जिल्ह्यात तब्ब्ल २६४८ रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
लॉकडाऊन सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चूक होत आहे हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. पवार आणि आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. त्यांनी तातडीने साताऱ्यात यावे आणि जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि नियोजनबद्धरीत्या जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
महिनाभर लॉकडाऊन असूनही परिस्थिती आटोक्यात आली नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या गोर- गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असंख्य लोकांची उपासमार सुरु आहे. लॉकडाऊन असाच सुरु राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे आणि जगणे मुश्किल होणार आहे, याचीही ना. पवार, ना. टोपे आणि प्रशासनाने गंभीर दाखल घ्यावी. तसेच रॅपिड ऍक्शन टेस्ट मध्ये वाढ करावी. ग्रामीण भागात सर्वत्र रॅट टेस्ट किट उपलब्ध करून द्यावी आणि बाधित आहेत पण कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांचा शोध घ्यावा, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडली जाईल. यासाठी ना. पवार आणि ना. टोपे यांनी साताऱ्यात यावे. परिस्थीतीचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.