स्थैर्य, दि. 29 : करोना संसर्गाच्या संकटकाळात होमिओपॅथीक औषध ‘अर्सेनिक अल्बम-३०’ ची मात्रा आयुष मंत्रालयाने सूचवल्याने या औषधाची मागणी प्रचंड वाढली आहे. होमिओपॅथीक औषध मुळातच दुष्परिणामविरहित असल्याने ‘अर्सेनिक अल्बम-३०’ ची मात्रा घेणे हे लोकांसाठी निश्चितपणे सुरक्षित व दिलासादायक ठरते आहे.
करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीसह लागू झालेल्या निर्बंधांदरम्यान, करोनाच्या विषाणूंना प्रतिकार करणारी औषधे, व्यायाम, घ्यावयाची दक्षता यासंदर्भात जगभर चर्चा झाली. पण, करोना विषाणूला मृत करणारे औषध वा लस निर्माण झालेली नाही. याच कालावधीत करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे ‘अर्सेनिक अल्बम-३०’हे प्रभावीपणे काम करीत असल्याचे दाखले समोर आले. याचवेळी भारत सरकारच्या केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद व आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम-३० हे औषध सध्याच्या करोनाच्या लक्षणांवरून ‘जीनस इपीडीमीकस’जाहीर केले. ते जनतेला प्रतिकारशक्तीवर्धक म्हणून वापरास सुचवण्यात आले.
करोनाचे संकट घोंगाऊ लागताच गुजरात, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश अशा प्रमुख राज्यांनी होमिओपॅथीच्या ‘अर्सेनिक अल्बम-३०’ औषधाला रितसर अनुमती देताना, सर्वप्रथम ते आरोग्य यंत्रणा, प्रशासन व पोलिसांना देण्यात आले. या राज्य शासनांच्या सूचनेनुसार तेथील जनतेनेही होमिओपॅथीच्या या औषधाचा अवलंब केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने महाराष्ट्र सरकारनेही ‘अर्सेनिक अल्बम-३०’चा अन्य राज्यांप्रमाणे अवलंब सुरू केला. परिणामी दिवसेंदिवस ‘अर्सेनिक अल्बम-३०’ची मागणी वाढत जाऊन आजमितीला या औषधाचा तुटवडा भासत आहे. खरेतर हे औषध अतिशय प्रभावी असतानाही त्याचे मूल्यही अत्यल्प असताना मात्र, सध्याच्या परिस्थितीत उपलब्धतेच्या तुलनेत मागणी प्रचंड राहिल्याने स्वाभाविकपणे या औषधाची किंमत काहिशी वाढली आहे.
‘अर्सेनिक अल्बम-३०’ची उपयुक्तता, उपलब्धता याबाबत राज्य शासनाच्या महाराष्ट्र होमिओपॅथीक परिषदेचे सदस्य व कराड येथील सुयश होमिओ फार्मसीचे संचालक डॉ. सुनील मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की महाराष्ट्रात ‘अर्सेनिक अल्बम-३०’ही औषधाची मात्रा देण्यासाठी लागणाºया ग्लोब्युल्स (साखरेच्या लहान गोल गोळ्या) निर्मितीचे दोनच आपल्या राज्यात कारखाने आहेत. त्यातील एक आपला स्वत:चा कराडनजीकच्या तासवडे एमआयडीसीत तर दुसरा कारखाना नागपूर येथे आहे. या दोन्ही कारखान्यांमधून ग्लोब्युल्स निर्मितीला मर्यादा असल्याने सध्या या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर पर्याय म्हणून सध्या सर्वत्र गरजेनुसार ग्लोब्युल्स पुरवून लोकांची सोय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘अर्सेनिक अल्बम-३०’ हे औषध केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद व आयुष मंत्रालयाने सूचवल्याप्रमाणे हे औषध देतानाच ते अतिशय कमी मात्रेने दिले जात आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम शक्य नसल्याचा विश्वास डॉ. मुळीक यांनी यावेळी दिला. आरोग्य यंत्रणा, पोलीस व प्रशासनातील विविध घटकांना करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष काम करावे लागत असल्याने ‘अर्सेनिक अल्बम-३०’ प्राधान्याने या घटकांनी मोठ्या संख्येने उपलब्ध करून घेतला. पाठोपाठ ग्रामपंचायती, नगरपालिकांनीही आपले सेवकवर्ग व नागरिकांसाठीही हे औषध वितरीत केले आहे. होमिओपॅथीक औषध हे मुळातच दुष्परिणामकारक नसल्याने ‘अर्सेनिक अल्बम-३०’ ची मात्रा आयुष मंत्रालयाने सूचवल्याप्रमाणे घेणे लोकांसाठी शारिरीक हिताचे ठरणार असल्याचे मतही डॉ. मुळीक यांनी व्यक्त केले.