दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । पुणे । पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून माहिती घेऊन या परिसरात अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.
पुणे शहरातील अवैध धंद्यांबद्दल आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ज्या पोलीसठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु आहेत आणि अशा काही घटना या भागात घडत असतील तर त्यावर कठोर उपाययोजना करण्यात येतील. पुणे शहरातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईल आणि या परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांना कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाय योजले जातील.
खडकवासला (जि. पुणे) क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड, किरकीटवाडी, नांदोशी व खडकवासला या चार गावांचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. हवेली पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत असलेल्या या गावांना आता नांदेड सिटी या नव्याने प्रस्तावित असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये वर्ग केले जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. भौगोलिकदृष्ट्या विचार करुन सिंहगडच्या अलीकडची गावे राजगड पोलीस ठाण्याला तर पलीकडची गावे हवेली पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आली आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.
या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान आमदार चेतन तुपे यांनी शहरी भागात नार्कोटिक्स नियंत्रण विभाग सशक्त करण्याची मागणी केली. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री म्हणाले की, हडपसर येथे दोन पोलीस ठाणी मंजूर करण्यात आली आहेत. जागा उपलब्ध झाल्यास पोलीस ठाणी लगेच सुरु करता येतील. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वकील आणि पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याप्रकरणी संबंधितांकडून माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल. त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार शासन करेल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सदस्य नाना पटोले यांनी केलेल्या मागणीवर सांगितले.