दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । मुंबई । मुंबईच्या महापौरांविरूद्ध आक्षेपार्ह विधान तसेच त्यांना आलेल्या पत्रामधून त्यांना आणि कुटुंबियांना दिलेल्या धमकीबाबत चौकशी सुरू असून लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी असून जेथे जेथे अशा घटना घडतील, तेथे गुन्हा करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
महापौरांना दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात व्यक्तीने पोस्टाने बंद लिफाफ्याद्वारे पत्र पाठवून त्यामध्ये अश्लील व घाणेरड्या भाषेतील मजकूर पाठवून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असून हा गुन्हा तपासाधीन आहे. या घटनेच्या अनुषंगाने मुंबईच्या महापौरांना सुरक्षेकरिता योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला असल्याचेही वळसे पाटील यांनी लक्षवेधीच्या लेखी उत्तरात सांगितले.
यासंबंधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, अजय चौधरी, अमित साटम, श्रीमती मनीषा चौधरी आदींनी सहभाग घेतला.