‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १५: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध  लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये, प्रधान सचिव विनीत अग्रवाल, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश  देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

कोरोनाच्या लढाईत पोलीस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलीस यंत्रणेला दिला.

त्रिसूत्रीचे पालन करा

जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री.वळसे पाटील यांनी यावेळी केले.

पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!