स्थैर्य, मुंबई, दि.११: मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलिस खात्यात 12 हजार 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. या मेगा भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात 5300 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे 12500 जागा भरल्यानंतर गरज पडल्यास आणखी भरती केली जाईल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून SEBC च्या आरक्षणाशिवाय पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण या निर्णयाला मराठा संघटनांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान अनिल देशमुख्यांच्या आजच्या घोषणेनंतर पोलिस भरती प्रक्रिया पार पडाली जाणार असल्याचे निश्चित झाले असले तरी मराठा संघटना याबाबत कोणताही भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.