फलटण एस. टी. स्टँडवर होर्डिंगमध्ये अडकलेल्या पक्षाची गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली सुटका


स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण येथील एस. टी. स्टँडवर असलेल्या एका होर्डिंगमध्ये दोऱ्यात अडकलेल्या एका पक्षाची गृहरक्षक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. वेळेवर मदत मिळाल्याने या पक्षाचा जीव वाचला.

एस. टी. स्टँडच्या आऊटगेट शेजारी असलेल्या होर्डिंगवर हा पक्षी दोऱ्यात अडकल्याचे, तेथे उपस्थित असलेल्या डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ स्टँडवर कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना ही माहिती दिली.

यावेळी, जवान महादेव दडस आणि त्यांचे सहकारी खुषाल भंडलकर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने होर्डिंगवर चढून त्या पक्षाला दोऱ्यातून मोकळे केले. त्यांनी पक्षाला कोणतीही दुखापत झाली आहे का, हे तपासून पाहिले आणि पक्षी सुखरूप असल्याची खात्री करून त्याला निसर्गात मुक्त केले. या दोन्ही जवानांनी दाखवलेल्या या करुणा आणि तत्परतेबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!