छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.

दि. 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सूर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

  1. कोविड–19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
  2. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
  3. नागरिकांनी नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
  4. महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरण, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी व त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण इ. उपाययोजना कराव्यात तसेच सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
  5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये “ब्रेक द चेन” च्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक/धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावयाचे झाल्यास या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
  6. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत.
  7. या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित

महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनाला असतील.

  1. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत, केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!