चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठिशी गृह विभाग – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । मुंबई । काही पोलीसांच्या चुकीमुळे संपूर्ण गृह विभागाला जबाबदार धरता येणार नाही. चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी गृह विभाग नेहमीच आहे, असे विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री श्री. वळसे – पाटील म्हणाले, मागच्या दोन वर्षात कोरोनाची परिस्थिती असताना सतत विविध राजकीय पक्षांची आंदोलने झाली. तसेच पोलिसांची आणि शासनाची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परंतू पोलीसांकडून कोरोना कालावधीत झालेल्या उल्लेखनीय कामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

सोलापूर येथील प्रकरणात ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले, त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलिस दलाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे. राज्य शासनाने अवैध धंद्यांना पाठबळ दिले नाही, असेही श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन फॉर्ज करुन खंडणी मागितल्याचा गुन्हा समोर आला. सध्या तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक गुन्हे समोर येत आहेत. या गुन्ह्यातील सहा आरोपींना तत्काळ अटक करण्यात आलेली आहे. धुळ्यात डिजे लावून होळी खेळण्यात आली आणि त्यादरम्यान अजान सुरु झाल्यानंतर झालेल्या राड्याचा उल्लेख केला गेला. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र आज राज्यातील गावागावात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. धार्मीक कार्यात आवाजाचा डेसिबल मर्यादित ठेवला जात नाही. पोलिसांची बंधने पाळली जात नाहीत, अशा पद्धतीने समाजाचे विघटन होणार असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयपीएल सामन्यांची कुणीही रेकी केलेली नाही. मुंबईत होणारे सर्व क्रिकेट सामने सुरक्षित वातावरणात पार पडतील, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!