
सातारा- येथील गोल मारुती मंदिर नजीक सार्वजनिक होळीमध्ये महिलांनी नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा घातली. (छाया -अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 3 मार्च, सातारा : फाल्गुन महिन्यातील होलीकोत्सव अर्थात होळी पेटवण्याचा सण सातारा शहर परिसरात मोठ्या उत्साहात सोमवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. दरवर्षी नको असलेले घरातील टाकाऊ पदार्थ वाळलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या, नारळाच्या झावळ्या, तुटके फर्निचर आदी टाकाऊ पदार्थ एकत्र करून अशा या दुर्गुणांची होळी करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतही गोल मारुती मंदिरा नजीक परिसरातील नागरिकांनी असे पदार्थ गोळा करून त्याची होळी पेटवून अधिकृतपणे दुर्जनांच्या नावाने बोंब ठोकली. शहरातील प्रमुख चौकात चौकामध्ये रात्री उशिरापर्यंत या होळ्या मोठ्या प्रमाणात पेटवून बोंब मारण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता .महिलांनी या होळीमध्ये घरोघरी बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्याचा काही भाग अर्पण करून फुल, पैसा तसेच खोबरे, नारळाचे दान करून या होळीभोवती तीन प्रदक्षिणा घालून बोंब ठोकली.
दरवर्षी होळी पेटवून झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी या पेटत्या होळीतील अग्नि शांत करून त्याच्यामध्ये धुळवड सण साजरा केला जातो शहरांमध्ये ही परंपरा पहायला मिळणे कमी झाले असली तरी गावोगाव गावी अशा प्रकारे धुळवडीचा सण हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सामिष म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवून घरोघरी मेजवानी करण्यात आल्याचे दिसून येत होते. अनेक गावे तसेच वाड्यावर वस्त्यांवरील ग्रामदेवतांच्या यात्रांनाही होळीपासून प्रारंभ होतो. अशा यात्रांनाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेला दिसून आला.
