मटाच्या फ़ुत्काराचा इतिहास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


‘आपले राज्यकर्ते, त्यांचे पाठिराखे किंवा सहानुभूतीदार वारंवार पाकिस्तानला हिणवत असतात. अधुनमधून पाकव्याप्त काश्मीरही भारताला जोडून घेण्याच्या चर्चा गंभीरपणे चालू असतात. ते होईल किंवा न होईल; पण भारताला सर्व अर्थांनी खरा व अधिक मोठा धोका हा चीनपासून आहे आणि तो कधीही लपलेला नाही. संरक्षणमंत्री असताना असे स्पष्टपणे बोलण्याचे धाडस एकट्या जॉर्ज फर्नांडिस यांनी दाखवले होते. तेव्हा त्यांच्यावर सगळे नाराज झाले, याचे कारण त्यांनी चीनला म्हणे दुखावून ठेवले.’

बुधवार १० जुन २०२० रोजीच्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या संपादकीयातला हा उतारा आहे. शीर्षक आहे, ‘ड्रॅगनच्या फ़ुत्काराचा अर्थ’. एकूण अग्रलेख वाचला तर आपल्याला असे वाटेल की भारत सरकारपेक्षा या संपादकांनाच देशाच्या परराष्ट्र धोरणाची किंवा सुरक्षाविषयक धोरणाची अक्कल आहे. किंबहूना त्यांना विचारल्याशिवाय भारत सरकारने चीन वा पाकिस्तानशी कुठलेही व्यवहार करणे म्हणजे साक्षात मुर्खपणाच असू शकतो. पण वस्तुस्थिती इतकी उलट आहे, की आजच्या या अग्रलेखातून या महाशयांनी जे काही अकलेचे तारे तोडलेले आहेत, ते त्यांनाही आणखी काही दिवसांनी आठवणार नाहीत. कारण परराष्ट्र धोरण किंवा अन्य देशांशी असलेले संबंध हा अग्रलेख खरडून काढण्याइतका साधा विषय नसतो, इतकीही जाण अशा लोकांकडे नाही. यानिमीत्ताने त्यांनी फ़र्नांडिसांचे जे कौतुक केले आहे, त्यांचेच आणखी एक विधान इथे नमूद करणे योग्य ठरेल.

सोनिया गांधी राजकारणात आल्या त्यावेळी कुठल्याशा एका पत्रकाराने जॉर्जना काही प्रश्न विचारला आणि पुढली रणनिती काय असा पिच्छा पुरवला होता. त्याला रणनिती या शब्दाचा अर्थ त्यांनी समजावला होता. तुमच्यासमोर बोललो तर ती रणनिती उरत नाही असेच जॉर्ज म्हणाले होते. पण त्याचा बोध संबंधित पत्रकाराला तेव्हा झालेला नव्हता आणि विद्यमान मटा संपादकांनाही झालेला नाही. रणनिती वा मुत्सद्देगिरी पत्रकार परिषदेतून होत नसते., त्यात वावरणारी माणसे खुप काही बोलतात आणि काहीही ‘सांगत नाहीत.’ त्याला रणनिती वा मुत्सद्देगिरी असे म्हटले जाते आणि ज्यांना त्यातले काहीही कळत नसते असेच लोक त्यावर तात्कालीन मुक्ताफ़ळे उधळत असतात. नेमके तसेच तेव्हाही कुमार केतकरांच्या बाबतीत झालेले होते. ते तात्कालीन संपादक होते.

१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी फ़र्नांडिसांचा आपल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून सहभागी करून घेतलेले होते. सहाजिकच हिंदूत्ववादी पक्षाच्या सोबत गेले म्हणून तमाम पुरोगाम्यांचे फ़र्नांडिस तात्काळ दुष्मन झालेले होते. अशा काळात अतिशय गोपनियता पाळून पोखरण येते दुसरा अणुस्फ़ोट करण्यात आला आणि तो झाल्यावरच त्याचा गवगवा झालेला होता. अमेरिकेने तात्काळ भारतावर निर्बंध लागू केले होते आणि अर्थातच सेक्युलर कुमार केतकरांचा जळफ़ळाट झालेला होता. त्यांच्यासारख्यांना भारताने यशस्वी केलेला हा गौप्यस्फ़ोट अजिबात मान्य नव्हता. म्हणूनच त्याच महाराष्ट्र टाईम्सचे संपादक म्हणून केतकरांनी लगेच अग्रलेख लिहीला होता. ‘आणि बुद्ध ढसढसा रडला’. त्या अग्रलेखातून केतकरांनी मांडलेली भूमिका वा विचारलेला सवाल आजच्या संपादकांनी वाचला असता, तरी त्यांनी निदान मटामध्ये आज जॉर्ज यांचे गुणगान करण्याचे धाडस केले नसते. केतकर किंवा तत्सम पुरोगामी विचारवंत संपादकांच्या मते त्या अणुस्फ़ोटाची गरज नव्हती. तो करण्यासाठी भारताला कुठूनही धोकाच नसेल तर अण्वस्त्रांची गरज काय होती, असा सवाल विचारलेला होता. त्याचे उत्तर देताना जॉर्ज फ़र्नांडिस यांनी चीनकडे बोट दाखवलेले होते. धोका फ़क्त किंवा केवळ पाकिस्तानपासून नाही. भारताचा खराखुरा शत्री चीन आहे असेच त्यांनी म्हटलेले होते. थोडक्यात कुमार केतकर किंवा मटाच्या संपादकीयाला मुर्खपणाचे विवेचन ठरवण्यासाठीच फ़र्नांडिसांनी उपरोक्त भूमिका मांडली होती. त्याच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला म्हणजेच तसा अग्रलेख खरडणार्‍या मटालाही त्यांनी मुर्ख ठरवले होते, मग आज त्यांच्यावर कौतुकाची उधळण करताना मटाने काय म्हणायला हवे होते?

फ़र्नांडिसांचे कौतुक करायला हरकत नव्हती. पण ती भूमिका तेव्हा किंवा अन्य प्रसंगी मान्य नसलेल्यांना जॉर्जनी चुकीचे ठरवले होते आणि त्यांचेच शब्द आज खरे ठरलेले आहेत. त्यासाठी अन्य राज्यकर्त्यांना वा राजकीय पक्षांना नाकर्ते ठरवताना मटाने तितक्याच अगत्याने आपल्या पुर्व संपादकांनाही मुर्ख नाकर्ते ठरवायला हवे होते ना? कारण आजवरचे राज्यकर्ते चीन बाबतीत चुकीचे ठरले असतील, तर त्याला तात्कालीन संपादक अभ्यासकही तितकेच जबाबदार आहेत. सुदैवाने तेव्हाचे फ़र्नांडिस वा आजचे मोदी अशा संपादकांची खर्डेघाशी वाचत नाहीत वा त्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, हे देशाचे नशीब म्हणायचे. त्या अणुस्फ़ोटाला आव्हान देताना केतकर म्हणालेले होते, ‘थ्रेट पर्सेप्शन काय होती?’ ती बघण्याची दृष्टी नुसती पुस्तके वाचून येत नसते. त्यासाठी प्रत्यक्ष राजकारण वा कारभारात झोकून द्यावे लागत असते. वातानुकुलीत केबिनमध्ये बसून जगाचे चिंतन करता येते. पण निर्णय घेणे वेगळी गोष्ट असते. धोरण आखणे व क्षणाक्षणाला बदलत्या परिस्थितीत त्यात आवश्यक बदल करून अंमल करणे अधिक जिकीरीचे काम असते. ते केतकरांना कधी जमले नाही आणि आजच्या संपादकांना तर केतकरही ठाऊक नसतात. त्यामुळे काही वर्षापुर्वी केतकरांची टिमकी वाजवणारे आज फ़र्नांडिसांचे गुणगान करू लागतात. मुद्दा इतकाच असतो, की परराष्ट्र निती, सीमेवरची रणनिती वा कारभारातील बारकावे, यांचा गंधही नसलेल्यांनी पुस्तके वाचून ताशेरे झाडण्यात अर्थ नसतो. किंवा न्यायदान केल्याप्रमाणे घडण्यापुर्वीच इतिहास लिहायची घाई करायची नसते. पण तितकी अक्कल आली, तर यांना केबिनमधले संपादक म्हणून नेमणार कोण? सिम्युलेटरवर इतरांना प्रशिक्षण देऊन कोणी वैमानिक होऊ शकत नाही. तसाच या गहन विषयातला कारभार असतो. लडाखच्या बाबतीत मागले कित्येक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्द बोललेले नाहीत. पण चीनी सैन्याला आक्रमकता सोडून चार पावले माघार घ्यावी लागली, ही अस्सल भारतातही वस्तुस्थिती आहे. आयडिया ऑफ़ इंडियातली कुठली परिकथा नाही.

इथे बसून असले वायफ़ळ अग्रलेख लिहीणारे आणि चिनी राजधानी बिजींगमध्ये बसून ग्लोबल टाईम्समधून पोकळ धमक्या देणारे चिनी प्राध्यापक; यात तसूभर फ़रक नाही. त्यांना शब्दांचे बुडबुडे उडवायची खेळणी दिलेली असतात आणि ते त्यातच रममाण झालेले असतात. त्यांना पायाखाली काय जळते आहे, ते कळत नाही किंवा आपल्याच शेजारच्या घरातल्या गोष्टीही ठाऊक नसतात. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींवर शहाणपणा शिकवण्याची हौस मात्र दांडगी असते. अन्यथा मटाकारांनी राहुल गांधींच्या पंगतीत बसून असा अग्रलेख लिहीला नसता. त्यांना चीनमध्ये वा त्याच्या दक्षिण पुर्वसीमेवर काय धमाल उडालेली आहे, त्याचाही थांगपत्ता लागलेला नाही. अक्साई चीन वा पाकव्याप्त काश्मिरातील घडमोडी शी जिनपिंगला कशाला अस्वस्थ करीत आहेत आणि लडाखमध्ये त्यांना हातपाय कशाला आपटायला लागत आहेत, त्याचा अंदाज तरी आला असता. तेव्हा फ़र्नांडिसांना चीनपासून धोका असल्याचे दिसू शकत होते आणि केतकर बघू शकलेले नव्हते. आज जिनपिंगसह चिनी कम्युनिस्ट पक्षालाच भारतापासून धोका असल्याचे दिसते आहे, पण विद्यमान संपादकांना घायकुतीला आलेला चीन भारतावर स्वारी करायला आलेला चेंगीझखान भासतो आहे. ३७० हटवल्यानंतर अक्साई चीन वादग्रस्त भूमी झाल्याची पोटदुखी चीनला भेडसावते आहे. भारत तिथे आक्रमक पवित्रा घेत असतानाच दक्षिण चिनी समुद्राच्या किनार्‍यावरच्या शेजार्‍यांची जमवाजमव चीनला भयभीत करते आहे. पण ते समजून घ्यायला हवे. असली रणनिती वा परराष्ट्रनिती कोणी पत्रकार परिषद घेऊन समजावत नसतो. ज्याला समजेल त्याला समजेल. इतरांना व प्रामुख्याने संपादकांना असली निती समजून काही उपयोगही नसतो. उलट अशा रणनितीमध्ये खुळ्या संपादकांचा मोहरे प्यादे म्हणूनही परस्पर वापर होत असतो. त्यांनाही त्याचा कधी पत्ता लागत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!