
फलटण नगरपरिषदेच्या इमारती आणि सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम अनुयायांनी आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. 26 मार्च : फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक ठराव (ठराव क्र. ९) बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, गुरुवारी फलटण शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम अनुयायांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा केला.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारती आणि सभागृहांना महापुरुषांची नावे दिली जावीत, ही अनेक दिवसांची मागणी होती. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले होते. यावेळी महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत, एकमेकांना पेढे भरवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण आणि सामाजिक अस्मितेच्या निर्णयासाठी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व सदस्यांचे आणि प्रशासनाचे समस्त अनुयायांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या जल्लोषप्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सुपर्णाताई अहिवळे, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मीनाताई काकडे, कामगार संघटनेचे सनी काकडे, हरीष आप्पा काकडे, आरपीआयचे (RPI) विजय येवले, संजय निकाळजे, संजय गायकवाड, सागर दादा सोरटे, प्रशांत आप्पा काकडे, सनी मोरे, सुनील नाना अहिवळे, विकी बोके, जीवन काकडे, वैभव मोहिते, किरण अहिवळे, पिंटू संभाजी मोरे, अभिजित गायकवाड, मुकेश रणपिसे, प्रकाश मोरे यांच्यासह समाजबांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
