
तब्बल ५ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर फलटण नगरपरिषदेत आज लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडत आहे. यामध्ये इमारतींचे नामकरण, शहराची हद्दवाढ आणि स्टेडियमसह ४६ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 25 मार्च : तब्बल ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर फलटण नगरपरिषदेत आज खऱ्या अर्थाने ‘लोकशाहीचा गजर’ होत आहे. शहरात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा आज सकाळी ११:०० वाजता पार पडत आहे. पहिल्याच सभेच्या विषयपत्रिकेवर (अजेंड्यावर) तब्बल ४६ महत्त्वपूर्ण विषय असल्याने या सभेकडे संपूर्ण शहराचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
पाच वर्षांच्या खंडानंतर सभागृहात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा आवाज घुमणार आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे आणि भविष्यातील योजनांच्या दृष्टीने आजची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नामकरणाच्या विषयावरून सभागृहात रंगणार चर्चा?
आजच्या सभेतील सर्वात लक्षवेधी आणि बहुचर्चित विषय क्रमांक ९ हा शहरातील प्रशासकीय इमारती, सभागृहे आणि शॉपिंग सेंटरच्या नामकरणाचा आहे.
-
नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीला ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’ नाव देण्याचा प्रस्ताव आहे.
-
सभागृहांना ‘क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव देण्याचे प्रस्तावित आहे.
-
शॉपिंग सेंटरला ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ आणि संजीवराजे नगरला ‘छत्रपती सईबाई महाराणी साहेब नगर’ अशी नावे देण्याचा विचार आहे. या प्रस्तावाला एका गटाने ‘जुनी नावे न बदलता नव्या वास्तूंना महापुरुषांची नावे द्यावीत’ असे सुचवत विरोध केला आहे, तर दुसऱ्या बाजूला ‘समस्त बहुजन समाजाने’ या नामांतराला जाहीर पाठिंबा देत नगराध्यक्षांना निवेदन दिले आहे. त्यामुळे या विषयावर आज सभागृहात सर्वसंमती होते की खडाजंगी पाहायला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विकासाचे महत्त्वाचे विषय:
नामकरणाव्यतिरिक्त शहराच्या विकासाला गती देणारे अनेक मोठे विषय आजच्या अजेंड्यावर आहेत:
-
शहराची हद्दवाढ: विषय क्र. १२ नुसार, फलटण नगरपरिषद कार्यक्षेत्राच्या आजूबाजूची गावे व वस्त्यांचा नगरपालिकेत समावेश करून शहराची हद्दवाढ करण्यावर चर्चा.
-
भव्य स्टेडियम: विषय क्र. १५ नुसार, फरांदवाडी येथील ५.८४ हेक्टर जागेवर शहरासाठी भव्य ‘स्टेडियम आणि क्रीडा संकुल’ विकसित करण्यासाठी जागा हस्तांतरित करणे.
-
सीसीटीव्ही व सुरक्षा: संपूर्ण शहरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा कार्यान्वित करणे.
-
नमो उद्यान: वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत फलटणमध्ये ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी जागेची निश्चिती करणे.
-
अभय योजना: थकीत करदात्यांसाठी मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ राबवण्याचा प्रस्ताव.
नव्या सत्ताधाऱ्यांकडून फलटणकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आजच्या या पहिल्याच ऐतिहासिक सभेत शहराच्या हिताचे कोणते मोठे निर्णय घेतले जातात आणि प्रलंबित प्रश्नांवर कशी उत्तरे शोधली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
