राजाळे (भीमनगर) येथे यंदा महिलांच्या नेतृत्वाखाली साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती; ‘भीमाच्या लेकींचा’ ऐतिहासिक निर्णय


फलटण तालुक्यातील राजाळे गावातील भीमनगर येथे यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी सार्वजनिक जयंती पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्याचा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २ एप्रिल : फलटण तालुक्यातील राजाळे गावातील भीमनगर येथे यंदा एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्धार येथील महिलांनी केला आहे. हा निर्णय केवळ एक कार्यक्रम नसून सामाजिक समता, स्त्रीशक्ती आणि परिवर्तनाचा एक नवा अध्याय ठरत आहे.

दि. २० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेला ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रह’ हा मानवी हक्क आणि समानतेसाठीचा एक क्रांतिकारी टप्पा होता. या घटनेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या ‘समता दिना’च्या पार्श्वभूमीवर आणि या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभीच राजाळे भीमनगरातील महिलांनी घेतलेला हा निर्णय अधिकच अर्थपूर्ण ठरतो.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त महिलांनी पुढाकार घेत, “स्त्री ही केवळ चूल आणि मूल” या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून समाजात नेतृत्वाची भूमिका निभावण्याचा ठाम संदेश दिला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या समान हक्कांच्या प्रेरणेने महिलांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे.

महोत्सवासाठी महिलांची प्रमुख समिती स्थापन:

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महिलांची एक प्रमुख समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये खालील महिलांचा समावेश आहे: १) बायनाबाई भिमराव भालेराव २) कल्पना महावीर भालेराव ३) शीतल गौतम भोसले ४) स्वाती संजय कांबळे ५) दीपाली शरद कांबळे ६) मानसी अजय भालेराव

या सहा महिलांकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार अशी महत्त्वाची पदे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख, सल्लागार, देखरेख, सजावट, उपहार आणि मनोरंजन अशा विविध समित्यांची रचना करून संपूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

जयंती महोत्सवाची भव्य रूपरेषा:

  • ६ एप्रिल : सकाळी ८ ते दुपारी २ – विज्ञान प्रदर्शन (स्थळ: जि. प. शाळा, राजाळे)

  • ७ ते १३ एप्रिल : दररोज दुपारी ११ ते ४ – “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन

  • ७ एप्रिल : सायं. ८ ते १० – सामाजिक समतेचा मेळावा

  • ८ एप्रिल : सायं. ८ ते १० – फनी गेम्स

  • १० एप्रिल : सायं. ९ वा. – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट

  • ११ एप्रिल : सायं. ७ ते ११ – भीम गीतांचा कार्यक्रम व ज्येष्ठ महिलांचा सत्कार

  • १२ एप्रिल : सायं. ८ ते ११ – महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम

  • १३ एप्रिल : सायं. ८ ते १२ – डान्स व नाटक स्पर्धा

  • १४ एप्रिल (जयंती दिन) : सकाळी – पुस्तके व झाडांचे वाटप आणि बक्षीस वितरण. सायंकाळी – भव्य मिरवणूक व ट्रॉली डेकोरेशन. (खास आकर्षण: महाड चवदार तळे सत्याग्रह व सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेचे जिवंत देखावे, टिपरी नृत्य व भोजनाचा कार्यक्रम).

महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आदर्श:

ही संपूर्ण रूपरेषा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका नसून तो सामाजिक समतेचा, स्त्रीशक्तीचा आणि विचार प्रबोधनाचा उत्सव आहे. आजपर्यंत गाव, तालुका किंवा जिल्हा स्तरावर असा महिलांच्या पूर्ण नेतृत्वाखाली जयंती साजरी करण्याचा निर्णय दुर्मीळच पाहायला मिळतो. त्यामुळे राजाळे भीमनगरचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे. भीमाच्या लेकींचा हा ऐतिहासिक निर्णय समतेचा, सन्मानाचा आणि नव्या युगाचा संदेश देणारा ठरत आहे.


Back to top button
Don`t copy text!